संकटातील शेतकरी ‘मिचाँग’च्या कचाट्यात

0

पुसेगाव : मिचाँग चक्रीवादळाच्या परिणामांमुळे उत्तर खटावात हवामान बदलाचा प्रभाव जाणवत असून, ढगाळ हवामानासोबत थंडीची तीव्रता कमालीची वाढली आहे. त्यातच सकाळी दाट धुके, दवबिंदू पडत आहेत.
त्यामुळे रब्बीच्या आणि नगदी पिकांवर रोगराईचे संकट ओढवले आहे. परिणामी, उत्पन्नात घट होण्याची भीतीने शेतकरी चिंतेत आहेत.
खटाव तालुक्यात यंदा पावसाअभावी दुष्काळजन्य संकट ओढावल्यामुळे खरीप हंगाम वाया गेल्यानंतर रब्बी हंगामात कसाबसा पेरा झाला आहे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार येथील शेतकऱ्यांनी कांद्याचे पीक घेतले आहे. मात्र, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी जपलेल्या नगदी आणि रब्बीच्या पिकांना मिचाँग चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा फटका बसत आहे.वातावरण आणखी काही दिवस असेच राहिले, तर कांद्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. आले, भाजीपाला आदी नगदी पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकचे पैसे खर्चून औषधांच्या फवारण्या कराव्या लागत आहेत. रब्बीची पिके चांगली वाढून खरीप हंगामाची नुकसानभरपाई वसूल होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, वातावरणातील बदल नुकसानाची चाहूल घेऊन आल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी निराश होत आहेत.
शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज

पिकांवर महागड्या औषधांची फवारणी केल्यानंतरही फारसा फायदा होणार नाही, असे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे. त्यामुळे मिचाँग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
असा होतोय परिणाम

कांद्यावर मावा, तुडतुडे व रस शोषणाऱ्या कीड, करपा व आकडीचा प्रादुर्भाव, कांदा पातीचे शेंडे करपणे, माना वाकड्या होणे, पाती पिवळसर पडणे, गहू, हरभरा, ज्वारी, चारा पिकांवर किडींचा प्रादुर्भाव 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here