सोलापूर : दुष्काळ, शेतमालाला रास्त भाव नाही, दुधाचे दर पडलेले, सर्व शेतकऱ्यांना दुष्काळ, अवकाळीची मदत नाही, पीकविमा नाही, अशा अडचणींमुळे बॅंकांचे कर्ज फेडणे कठीण झाले आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यातील साधारणतः एक लाख शेतकऱ्यांकडे जिल्हा मध्यवर्ती बॅंक, राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंकांसह अन्य बॅंकांची शेती कर्जाची थकबाकी दोन हजार ६९३ कोटी असून या थकबाकीमुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’ करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा कागदावरच असल्याची स्थिती आहे. त्याचे कारण म्हणजे, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या वर्षात राज्यातील तब्बल दोन हजार ८५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर चालू वर्षात १ जानेवारी ते ३१ मे २०२४ या काळात तब्बल एक हजार ६७ शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील ३१ शेतकऱ्यांचा समावेश आहे. आता शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची अपेक्षा असून राज्य सरकार अधिवेशनात याचा निर्णय घेईल, अशी कोट्यवधी शेतकऱ्यांना आशा आहे. मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलीचा विवाह अशा बाबी हाताळताना दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी अशा नैसर्गिक संकटांमुळे बळिराजाला डोक्यावरील बॅंकांचे कर्ज फेडणे कठीण झाल्याचीही वस्तुस्थिती आहे.
शेतकऱ्यांकडे ४८०० कोटींचे वीजबिल थकीत
सोलापर जिल्ह्यात ‘महावितरण’चे तीन लाख ९२ हजारांपर्यंत शेतकरी (कृषीपंप) ग्राहक आहेत. त्यांच्याकडे सद्य:स्थितीत ‘महावितरण’ची चार हजार ८०० कोटी रुपयांपर्यंत थकबाकी आहे. अडचणींमुळे शेतकऱ्यांना सवलतीच्या योजना शासनाने जाहीर करूनही ‘महावितरण’ची थकबाकी भरता आलेली नाही. अवकाळी, दुष्काळ अशा संकटातून बाहेर पडणाऱ्या बळिराजाला आता वीजबिलाची संपूर्ण थकबाकी माफ होण्याची आशा आहे.
सगळेच सत्ताधारी, मग बळिराजाचे दुखणे कोण मांडणार?
राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून सुरू होणार आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी हवी असून तशी मागणीही आहे. दुष्काळी स्थितीमुळे सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक शेतकऱ्यांकडे कोणत्या ना कोणत्या बॅंकेचे शेतीकर्ज थकीत आहेच. पूर्वीची थकबाकी असल्याने नव्याने कर्ज मिळत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. जिल्ह्यातील विरोधी पक्षाच्या एकमेव आमदार प्रणिती शिंदे आता खासदार झाल्याने सध्या जिल्ह्यातील सर्वच आमदार सत्ताधारी पक्षाचेच आहेत. त्यामुळे राज्याच्या पावसाळी अधिवेशनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी व कर्जमाफीची मागणी सत्ताधारी करणार का, प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील शेतीकर्जाची थकबाकी (मार्चपर्यंत)
थकबाकीदार शेतकरी
८५,५१८
डीसीसी बॅंक
८१९.८८ कोटी
राष्ट्रीयीकृत बॅंका
१२९७.६७ कोटी
खासगी बॅंका
४६५.०३ कोटी
स्मॉल फायनान्स बॅंका
९.०६ कोटी
विदर्भ कोकण बॅंक
१०१.३२ कोटी
एकूण थकबाकी
२६९२.९६ कोटी