सत्तेचा मलिदा चाखण्यात कोणते बोके मश्गुल आहेत हे कोपरगावच्या जनतेला चांगलेच माहीत आहे 

0

-माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांचा पलटवार 

कोपरगाव : दि. ४ ऑक्टोंबर २०२२

             गेल्या तीन वर्षापासून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून सत्तेचा मलिदा चाखण्यात कोणते बोके मश्गुल आहेत हे कोपरगावच्या जनतेला चांगलेच माहीत आहे. गेली तीन वर्षे ज्यांनी कोपरगाव शहर आणि तालुक्याचा कोणताही विकास केला नाही, वारंवार विकासाच्या खोट्या वल्गना करणाऱ्या आ. आशुतोष काळे यांनी वाढीव घरपट्टी रद्द करण्यासाठी लक्ष का घातले नाही, या प्रश्नावर दुटप्पी भूमिका का घेतली, असा सवाल माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना विजय वाजे म्हणाले, कोपरगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून तुमची नैतिक जबाबदारी असतानाही तुम्ही करवाढीच्या प्रश्नाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले, अर्धवट सल्लागाराच्या सल्ल्याने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याच्या ‘हो’ ला हो’ ला मिळवत ४० टक्के करवाढीला मूकसंमती देऊन शहरातील २५ हजार मालमत्ताधारकांच्या मानेवर सुरी फिरविण्याचे पाप तुम्ही केले आहे. त्यामुळे जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. करवाढीच्या प्रश्नावर तुम्ही चुकीची भूमिका घेतली. मालमत्ताधारकांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्यावर आर्थिक बोजा टाकण्याचे काम तुम्ही करत होता, त्यामुळे नागरिकांच्या हितासाठी भाजप प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांना करवाढीच्या प्रश्नात लक्ष घालून रस्त्यावर उतरावे लागले. साखळी उपोषण करावे लागले. स्नेहलताताई कोल्हे यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे प्रशासनाला कोपरगाव नगर परिषदेने केलेल्या मालमत्ता करवाढीला स्थगिती द्यावी लागली. कोल्हे परिवाराने मालमत्ता करवाढीचा प्रश्न सोडविल्यामुळे तुमच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे तुमची लायकी-पात्रता नसताना तुम्ही कोल्हे परिवारावर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर बेछूट व बिनबुडाचे आरोप करत आहात हे न कळायला जनता काही दूधखुळी नाही.

तुम्ही आमच्यावर आरोप करताना अकलेचे तारे तोडले. नगरपालिकेत भाजप-शिवसेनेचे बहुमत होते. ५ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या कोपरगाव नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव क्र.१६ प्रमाणे भाजप-शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी जनहिताचा विचार करून मालमत्ता करवाढीला कडाडून विरोध केला होता. मालमत्ता करवाढीसंबंधीचा ठराव त्यावेळी तहकूब केलेला होता. या ठरावाचे सूचक भाजपचे नगरसेवक स्वप्नील निखाडे होते तर अनुमोदक मी स्वत: (विजय वाजे) होतो. एवढाही तुमचा अभ्यास नसल्यामुळे तुमच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे दिसते. मालमत्ता करवाढीचा ठराव तहकूब केलेला असतानाही नगर परिषद प्रशासनाने नागपूरच्या आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीने केलेल्या कोपरगाव शहरातील मालमत्ताधारकांच्या चुकीच्या सर्वेक्षणाच्या आधारे मालमत्ताधारकांना वाढीव घरपट्टीच्या नोटिसा दिल्या. या वाढीव घरपट्टीला सर्वात अगोदर भाजप, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) ने विरोध केला आणि तसे निवेदन नगर परिषद प्रशासनाला देऊन ही अवास्तव करवाढ रद्द करण्याची मागणी लावून धरली. त्यासाठी पुढे साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला. या सर्व घडामोडी घडत असताना आ.आशुतोष काळे आणि त्यांचे कार्यकर्ते काय करत होते? गेल्या तीन वर्षांपासून आ. काळे हे कोणत्याही कामाबाबत फक्त प्रशासनाशी पत्र व्यवहारच करतात, बैठका घेण्याचा व सूचना दिल्याचा फार्स करतात आणि हे काम मार्गी लागणार आहे, असा कांगावा सोशल मीडियावर करून नागरिकांची दिशाभूल करत असतात. फ्लेक्सच्या माध्यमातून सवंग लोकप्रियता मिळविण्याचा प्रयत्न करत असतात. प्रत्यक्षात जनतेची कोणतीही कामे पूर्ण झाल्याचे दिसत नाही. नागरिकांची मला खूप काळजी आहे, असा खोटा कळवळा दाखवतात. हे जनतेला हळूहळू समजू लागले आहे, असा टोलाही वाजे यांनी आ. काळे यांना लगावला आहे. 

तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे बोलावे!

गेल्या तीन वर्षांपासून आमदारांच्या नावाखाली शहरात कुणाचे काळे धंदे सुरू आहेत याची जनतेला चांगलीच माहिती आहे. जसे मांजर डोळे झाकून दूध पिते, तिला वाटते की, आपल्याला कोणीच बघत नाही; परंतु इतरांना मांजर दूध पित असल्याचे दिसत असते. तुमच्या काळे धंद्यांचेही तसेच आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे बोलावे, असा सज्जड इशारा विजय वाजे यांनी सुनील गंगुले यांना दिला आहे.

चौकट….

कोल्हे कुटुंबीयांवर टीका करण्याची सुनील गंगुले यांची लायकी आहे का?

कोल्हे कुटुंबियांच्या नेतृत्वाखाली वाजे परिवार गेल्या २० वर्षांपासून जनतेच्या आशीर्वादाने नगर परिषदेत निवडून येत आहे. जनतेचे आमच्याप्रती असलेले प्रेम आणि आमच्यावर असलेला विश्वास यामुळेच हे शक्य झाले आहे. यासाठी जनतेची कामे करावी लागतात. जनतेच्या सुख-दु:खाशी समरस व्हावे लागते. तेव्हाच ही संधी मिळू शकते. मात्र, हे तुमच्यासारख्या प्रथमच चुकून आणि अपघाताने निवडून आलेल्या लोकांना कसे काय कळणार? असा टोला विजय वाजे यांनी सुनील गंगुले यांना लगावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here