सुदाम गाडेकर /जालना :
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या जालना जिल्ह्यात पिकाचे पंचनामे बांधावर जाऊन करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला कृषी मंत्री सत्तार यांनी दिले आहे. मात्र सर्व सरकारी कर्मचारी संपावर असल्याने पंचनामे कोण करणार शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. जालना जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अवकाळी पावसाने खूप मोठे नुकसान झाले आहे .काही ठिकाणी गारपीट ,अवकाळी पाऊस झाल्याने गव्हू ,ज्वारी, कांदा ,हरभरा, बाजरी या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
आज जालना जिल्ह्यात नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री अब्दुल सत्तार पाहणी करण्यासाठी आले होते. त्यानी जिल्हा प्रशासन यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले .
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरामध्ये गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील काढणीस आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांसह मोसंबी बागांचे मोठे नुकसान झाले आहे.
यावेळी अंतरवाली सराटी शिवारातील गट नंबर 197 मधील संजय कुमार तांदळे यांच्या शेतातील वादळी वाऱ्यासह गारपिटीने आडवा झालेल्या गहू पिकाच्या नुकसानीची पाहणी सत्तार यांनी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना कृषी अधिकारी भिमराव रणदिवे यांना दिल्या. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, नायब तहसीलदार धनश्री भालचिम, स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष गणेश गावडे, सेवानिवृत्त मंडळ कृषी अधिकारी हनुमंत काळे, उपस्थित होते.