सातारा : प्राथमिक शाळांंतील ज्यांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे, अशा शाळा बंद करून त्या खासगी ठेकेदारांना चालवण्यास देण्याचा निर्णय झाल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मिळाली.
त्यामुळे संतप्त झालेले या कार्यकर्ते शालेय गणवेश घालून जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर शाळा भरवून निषेध नोंदवला. या वेळी सांग सांग एकनाथ शाळा टिकेल काय… अशी कविता सादर केली. तसेच आई माझे पत्र हरवले..हा खेळही खेळला.
ज्या शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे, अशा शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्या शाळा खासगी ठेकेदारांकडून चालविण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मिळाल्याने त्यांनी याचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार सकाळीच शालेय विद्यार्थ्यांचा पेहरावा करून रिपब्लिकन पक्षाचे सातारा तालुका अध्यक्ष अप्पासाहेब तुपे, महिला जिल्हाध्यक्ष पूजा बनसोडे, सचिन वायदंडे, वैभव गायकवाड, रवींद्र बाबर, अक्षय कांबळे, राजू कांबळे, अजय घाडगे, रमेश गायकवाड हे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.
या कार्यकर्त्यांनी खाकी चड्डी, सफेद शर्ट असा पेहराव तसेच बॅग, वॉटर बॉटल शूज घातले होते. विद्यार्थी ज्या पद्धतीने शाळेत प्रवेश करतात, तशाच पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी त्यांच्या सोबत चर्चा केली.
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या गणवेशातील हे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी भोजनही केले. वास्तविक पाहता शासकीय पातळीवर असा कोणताही निर्णय झालेला नाही. परंतु याबाबत झालेले आंदोलन हे खऱ्या अर्थाने बहुजन समाजात जागृती असल्याचे दाखवून गेले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) हे केंद्र व राज्यात सत्तेवर असूनही बहुजन समाजावर अन्याय होत असेल, तर आम्ही रस्त्यावर उतरून त्याचा मुकाबला करू, असा इशारा तालुका अध्यक्ष अप्पासाहेब तुपे यांनी दिला.