सातारा, स्वामी सदानंद : जागतिक वारसा स्थळ असणार्या कास पुष्प पठारावरील फुलांच्या हंगामाचा शुभारंभ मुख्य वनसंरक्षक रामानुज यांच्या हस्ते शनिवारी झाला.
दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी कास पुष्प पठारावर फुले पर्यटकांनी गर्दी केली. शेकडो वाहनातून पहिल्याच दिवशी 1784 पर्यटकांनी फुले पाहण्याचा आनंद घेतला.
<p>यावेळी सातार्याचे प्रभारी उपवनसंरक्षक उत्तम सावंत, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी, डॉ. निवृत्ती चव्हाण, माजी जि. प. सदस्य राजू भोसले, माजी नगरसेवक रवी ढोणे, श्रीरंग शिंदे, 22 गाव समाज अध्यक्ष राम पवार, के. के. शेलार, कास पठार कार्यकारी समिती उपाध्यक्ष दत्तात्रय किर्दत, माजी अध्यक्ष सोमनाथ जाधव यांच्यासह कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कास पठारावरील हंगामाला यंदा विलंब झाला तरी फुलांचा बहर येण्यास चांगल्याप्रकारे सुरूवात झाली आहे. सध्या पठारावर डोसेरा, गेंध, चवर, सितेची आसवे,तेरडा, नीलिमा, आभाळी, नभाळी, आबोलिमा, दिपकाडी, मंजरी, कुमुदिनी,कंदील पुष्प या फुलांचा बहर पहावयास मिळत आहे. कास पुष्प पठारासह पर्यटकांनी कास परिसरातील कास धरण, भांबवली वजराई धबधबा, बामणोली, शेंबडी, मुनावळे येथील बोटिंगचा आनंद लुटला. काही पर्यटकांनी नव्याने सुरू करण्यात आलेला मुनावळे धबधबा पाहण्याचा आनंद घेतला.