कोरेगाव : सातारा ते कोरेगाव रेल्वे लोहमार्गावर १५२/२ किलोमीटरवर काल (शनिवार) सकाळी साडेअकरा वाजता मालगाडीचे दोन डबे रेल्वे रुळावरून घसरल्याने सुमारे दोन ते तीन तास रेल्वे वाहतूक विस्कळित झाली. डबे घसरण्याचे कारण समजू शकले नाही. मात्र, पुढील चौकशीत ते पुढे येईल असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की कोरेगाव ते सातारा रेल्वे लोहमार्गादरम्यान शिरढोण- मंगळापूर (Shirdhon- Mangalapur) या गावांच्या मध्यावर १५२/२ किलोमीटरवर काल सकाळी साडेअकरा वाजता एका मालगाडीचे दोन डबे अचानक रेल्वे रुळावरून खाली उतरले. मात्र, प्रसंगावधान राखत रेल्वेच्या चालकाने रेल्वे थांबविल्याने पुढील मोठा अपघात टळला.
डबे घसरल्याचे समजताच रेल्वे प्रशासनाने अपघातग्रस्त ट्रॅक बंद ठेवून दुसऱ्या ट्रॅकने रेल्वे वाहतूक वळवली. तातडीने डबे व रेल्वे ट्रॅक दुरुस्तीसाठी मिरज येथून पथकही मागवण्यात आले. मात्र, या दरम्यान चार प्रवासी रेल्वे गाड्या सुमारे दोन ते तीन तास उशिरा धावल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
पुणे विभागीय पातळीवरील रेल्वे अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अखेर सायंकाळी पाचच्या सुमारास दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू झाली. जेव्हा रुळावरून डबे खाली घसरले तेव्हा रुळाखालील मोठ मोठी खडी अक्षरशः २०० ते ३०० मीटर अंतरावर उडत होती. सुदैवाने आजूबाजूला फारसे कोणी नसल्याने कोणाला इजा झालेली नाही, असे प्रत्यक्षदर्शनी सांगितले.
मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरल्याने मुंबई- कोल्हापूर (कोयना एक्स्प्रेस) ही सव्वाचार वाजता जाणारी गाडी साडेसहा वाजता गेली. पावणेतीनच्या सुमारास जाणारी पुणे- कोल्हापूर पॅसेंजर साडेपाच वाजता गेली. दुपारी पावणेबारा वाजता जाणारी कोल्हापूर- मुंबई (कोयना एक्स्प्रेस) दुपारी दीड वाजता गेली. बंगळूर- अजमेर ही एक्स्प्रेस दुपारी तीन वाजता जाणारी दोन तासांच्या विलंबाने सायंकाळी पाच वाजता मार्गस्थ झाली.