दहिवडी (जि. सातारा): माण तालुका रविवारी भूकंपाच्या धक्क्याने हादरला. तालुक्यातील तीन गावांत या भूकंपाचे धक्के जाणवले.
यामुळे सुमारे १५ घरांना तडे गेले आहेत. दरम्यान, कोयना भूकंप मापकावर दोन धक्क्यांची नोंद झाली असून, सर्वात मोठा धक्का हा ३.४ रिश्टर स्केलचा होता.
कोयना धरण परिसरात वारंवार भूकंपाचा धक्का जाणवतो. पण, माण तालुक्यात वर्षानुवर्षे धक्के जाणवत नाहीत. मात्र, रविवारी दिवसभरात दोन धक्के जाणवले. तालुक्यातील पळशी, धामणी आणि ढाकणी परिसरात भूकंपाचा धक्का बसला. सकाळी १० वाजून ३१ मिनिटांनी पहिला धक्का जाणवला.
या धक्क्याची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी होती, तर सातारा शहरापासून पूर्वेकडे ७३.६ किलोमीटर अंतरावर हा धक्का जाणवला. त्यानंतर सायंकाळी ४ वाजून ४९ मिनिटांनी दुसरा धक्का जाणवला. या धक्क्याची तीव्रता २.८ रिश्टर स्केल होती. हा धक्का साताऱ्यापासून ६८.८ किलोमीटर अंतरावर होता. या भूकंपाच्या दोन्हीही धक्क्यांची नोंद कोयनानगर येथील भूकंप मापकावर झालेली आहे.