सातारा : आजपासून पुढील आठवडाभर म्हणजे गुरुवार दि.१३ एप्रिल पर्यन्त संपूर्ण महाराष्ट्रात वीजा व गडगडाटीसह ढगाळ व तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाचे वातावरणाची शक्यता जाणवते. उद्या व परवा (७ व ८ एप्रिल, शुक्रवार व शनिवार रोजी) २ दिवस वातावरणाचा जोर विशेषतः नाशिक नगर पुणे सातारा सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यासहित मराठवाडा, विदर्भात अधिक जाणवतो. माणिकराव खुळे, ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्, भारतीय हवामान खाते, पुणे.
मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५
उद्या शुक्रवार दि.७ एप्रिल रोजी खान्देश नाशिक नगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यासहित व मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
सध्याचे तापमाने सरासरी इतके किंवा त्यापेक्षा काहीसे खाली असुन येत्या ३ दिवसात हळूहळू दुपारच्या कमाल तापमानात अजून घसरण होवून त्यापुढील ५ दिवस काहीशी उष्णता कमी जाणवेल. असे वाटते.
शेतकऱ्यांनी सध्याच्या कांदा व रब्बी पिकांच्या काढणीच्या काळात (विशेषतः दि.७ व ८ एप्रिल ला) झाक-पाकीच्या साधनासहित सावधानता बाळगावी. असे वाटते. वीटभट्टी कारागीरांनी हे २ दिवस सावध असावे, असे वाटते.
भारताच्या दक्षिण द्विपकल्पात शेजारी -शेजारी तयार झालेल्या दोन उच्चं दाब क्षेत्रे व त्या दोघांच्या सापटीतून म्हणजे उत्तर कर्नाटकाच्या कलबुर्गी, रायचूरपासुन ते तामिळनाडूच्या वेल्लोरपर्यन्तच्या समुद्रसपाटी पासुन ९०० मीटर उंचीपर्यंतच्या हवेच्या जाडीत स्थित काहीसा दक्षिणोत्तर हवेच्या कमी दाबाचा आस तयार झाला आहे.
ह्या दोन उच्चं दाब क्षेत्रात स्वतंत्रपणे घड्याळ काटा दिशेने चक्रकार पद्धतीने प्रत्यावर्ती चक्रीय वारे वाहतात. ह्यालाच वाऱ्याची ‘ वारा खंडितता ‘ प्रणाली म्हणतात, ती सध्या घडून आली आहे.
ह्या चक्रकार वाऱ्यांच्या अतिबाहेरील परीघ क्षेत्रातुन वर स्पष्टीत आसादरम्यान बंगाल व अरबी समुद्रातून घेऊन ओतलेली आर्द्रतामुळे महाराष्ट्राच्या भूभागावर तुरळक ठिकाणी ही किरकोळ पावसाची शक्यता जाणवत आहे. वातावरणाचा कालावधी कमी झाला किंवा अधिक एकाकी काही बदल झाल्यास नवीन अपडेट दिले जाईल.