गुन्हा दाखल करण्याची सुप्रिया सुळेंची मागणी
कोल्हापूर : सिंचन घोटाळ्यातील ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळ्याचा ज्यांच्यावर आरोप केला, ज्यांची याबाबत चौकशी सुरु आहे अशांनाच या घोटाळ्याची फाईल दाखवून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेशी गद्दारी केली आहे.
फडणवीस यांनी गोपनीयतेचा भंग केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, भारतीय जनता पक्षाने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सगळे भाजपमध्ये आहेत. ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर आहेत, त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी बोलावून फाईल दाखवली. त्यांनी गोपनीयतेचा भंग केला असून राज्यातील सगळ्या जनतेला फसवले आहे. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
दिल्लीच्या अदृश्य शक्तीला महाराष्ट्र घाबरणार नाही. ईडी, सीबीआय व इतर एजन्सींच्या माध्यमातून फोडाफोडी केली जाते. मात्र, हा महाराष्ट्र दिल्लीच्या अदृश्य शक्तीला कधीही घाबरणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीत हे महाराष्ट्राने दाखवून दिले असल्याचेही सुळे म्हणाल्या.