राहुरी विद्यापीठ, दि. 18 ऑक्टोबर, 2022
बायोगॅस प्लांट हे शेणावर प्रक्रिया करण्यासाठी सर्वात आशादायक अक्षय तंत्रज्ञानांपैकी एक
आहे. विकेंद्रित बायोगॅस तंत्रज्ञान कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात भारत निश्चितपणे
अग्रेसर आहे. ग्रामीण भागात बायोगॅस तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये अनेक आर्थिक आणि
तांत्रिक अडथळे आहेत. कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना सर्वात महत्त्वाचा तांत्रिक अडथळा
म्हणजे बायोगॅस उत्पादनाच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅकिंग यंत्रणेचा अभाव. अनेक
बायोगॅस संयंत्रे आहेत जी बसविल्यानंतर निकामी होतात. डिजिटल मॉनिटरिंग यंत्रणा सर्व
प्लॅन्टचा मागोवा ठेवण्यास आणि सुधारात्मक कृती करण्यास नक्कीच मदत करेल असे प्रतिपादन
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण
केंद्र, पशुसंवर्धन व दूधशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे येथे स्मार्ट डिजिटल बायोगॅस
मीटर बसविण्यात आले आहे. हे मीटर दर 1 तासाने बायोगॅस उत्पादनावर लक्ष ठेवण्यास मदत
करते तसेच डायजेस्टर प्रेशरची माहिती देखील देते. यासाठी एक स्वतंत्र लॉगिग आयडी तयार
केला आहे आणि आपण कोणत्याही संगणकावरून सर्व माहिती मिळवू शकतो. बायोगॅस प्लांटचे
डिजिटल मॉनिटरिंग बायोगॅस उत्पादनाचा मागोवा ठेवण्यास आणि कोणत्याही समस्येच्या
बाबतीत सुधारात्मक कारवाई करण्यास मदत होणार आहे.
स्मार्ट बायोगॅस मीटरमुळे जगातील कोठूनही विविध प्लांटच्या बायोगॅस उत्पादनावर लक्ष
ठेवण्यास मदत होईल. स्मार्ट बायोगॅस सयंत्राच्या वापरामुळे एक किलो शेणापासून किती बायोगॅस
तयार होतो तसेच उत्पादित झालेल्या मिथेन उत्सर्जनाच्या नोंदणीमुळे कार्बन क्रेडिट
मिळवण्यासाठी सुद्धा याचा भविष्यात वापर करण्यास सोपे जाणार आहे. सध्या देशी गाय
संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या देशी गाईंचे संवर्धन भ्रूण प्रत्यारोपण
या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चालू आहे तसेच शाश्वत देशी गोपालन होण्यासाठी शेण व
गोमूत्रावरती प्रक्रिया करून त्याचा उपयोग पर्यावरण पूरक विविध वस्तू जसे मूर्ती, कुंड्या,
पणत्या, लाकूड तसेच नैसर्गिक सेंद्रिय शेतीसाठी गांडूळखत, फॉस्फरस युक्त सेंद्रिय खत, विविध
जिवाणू युक्त बायोस्लरी इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव केल्यास नक्कीच देशी गोपालन व्यवसाय
फायदेशीर होणार आहे असे प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी नमूद केले. सदर
प्रकल्पाचे किसान गॅस, पुणे या स्टार्टअप कंपनी बरोबर काम चालू असून त्यांना केंद्र सरकारने
या कामासाठी विशिष्ट पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी
सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, पशुसंवर्धन विभागाचे तांत्रिक प्रमुख व प्राध्यापक डॉ.
धीरज कंखरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रमोद साखरे व डॉ. सुनील अडांगळे प्रयत्न करत आहेत.