हिवरगाव पावसा टोल प्लाझा विरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेसची आरपारची लढाई – कपिल पवार

0

संगमनेर : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अनेक मोठमोठ्या खड्ड्यांमुळे निष्पाप लोकांचे बळी जात असताना आणि काही गंभीर जखमी होत असताना टोल नाका प्रशासन मात्र रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिवरगाव पावसा टोल प्लाझा विरोधात आरपारची लढाई करणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी सांगितले. 

          तरुण उद्योजक जयवंत रवींद्र शिंदे यांच्या अपघातानंतर संगमनेरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झाली असून त्यांनी हिवरगाव पावसा टोल प्लाझा विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसण्याचे निश्चित केले आहे. याबाबत अधिक माहिती देताना कपिल पवार म्हणाले की टोल प्लाझा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले आहेत. अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. टोल प्लाझा वाले रात्री, अपरात्री झालेल्या अपघातग्रस्त लोकांचे फोन उचलत नाहीत. कोणाला घाबरत पण नाहीत. यांना कोणाचा राजाश्रय आहे की काय हेही कळत नाही. असा प्रश्न उपस्थित करत कपिल पवार म्हणाले की हिवरगाव पावसाच्या या टोल प्लाझा प्रशासनाला कशाची मग्रुरी आली आहे. याबाबत टोल प्लाझा प्रशासनाला विचारायला गेले असता पोलीस, टोल प्लाझा प्रशासनाची बाजू घेत असल्याचे पवार यांनी सांगितले. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि टोल प्लाझा प्रशासन यांची मिलीभगत आहे की काय ? असा प्रश्न पडतो. या टोल प्लाझा प्रशासनाकडे रस्त्याची देखभाल दुरुस्तीसह रात्रीचे पेट्रोलिंग असते. अपघात झाला तर ॲम्बुलन्सने अपघात ग्रस्त लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणे तसेच अपघातग्रस्त वाहन ओढण्यासाठी क्रेन असणे आवश्यक आहे. यापूर्वी या टोल प्लाझा विरोधात नवटंकी आंदोलने अनेक झाली. मात्र आता यापुढे खड्ड्यांमुळे या रस्त्यावर कोणाचेही बळी जाऊ देणार नाही. यासाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी हिवरगाव पावसा टोल प्लाजा विरोधात आता आरपारची लढाई करणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी सांगितले. दरम्यान या महामार्गावर असणाऱ्या घारगाव, बोटा, 

डोळासने, साकुर फाटा, चंदनापुरी घाट, संगमनेर बायपास या ठिकाणी अनेकदा अपघात होऊन काहींना या अपघातात आपल्या जीवाला गमवावे लागले तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. क-हे घाट ते आळेफाटा या दरम्यान प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे्डे पडले असताना टोल प्लाजा प्रशासन मात्र टोल वसुली करण्यातच मग्न असल्याचा आरोप या रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या वाहनधारकांनी केला आहे. ऐन दिवाळीच्या सणासुदीमध्ये निष्पाप युवकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याची जबाबदारी कोण घेणार ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here