मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या १० ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, असा अंदाज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलाय. बीबी सीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी वरील अंदाज व्यक्त केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे तर . या चर्चाना काहीच अर्थ नसून एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी राहतील असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चाना छेद देण्याचा प्रयत्न केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “मी माझ्याकडे असणाऱ्या माहितीच्या आधारावर एक राजकीय विश्लेषक म्हणून हे वक्तव्य केलेलं होतं. याबाबत माझं आकलन आजही असं आहे की, अतिशय महत्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीला समोर ठेवून भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी एक निर्णय केलेला आहे.
“ज्यानुसार त्यांना असं वाटत की सध्या मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे काही महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचा प्रभाव पाडू शकलेले नाहीत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला लोकसभा निवडणुकांना सामोरं जाता येणार नाही. त्यामुळे आता अजित पवारांना भाजपने सोबत घेतलेलंच आहे तर त्यांना आता ती जबाबदारी द्यावी.
“विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आता जेव्हा एकनाथ शिंदे आणि सोळा आमदारांच्या पक्षांतराबाबत जेंव्हा निर्णय देतील, जो निर्णय १० ऑगस्टपर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेंचं निलंबन होईल आणि मग त्यानंतर जे पद रिक्त होईल तिथे काही व्यवस्था केली जाण्याची शक्यता आहे. कदाचित त्याआधीही हा निर्णय होऊ शकतो असं माझं आकलन आहे.”
अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा गेल्या एक-दोन आठवड्यात जोर धरू लागलीय. आधी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादीचे नेते सलीम सारंग यांनी लावलेल्या बॅनरमुळे, तर नंतर वाढदिवसाच्या सदिच्छा देताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्वीटमुळे अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा राजकीय वर्तुळात जोरानं सुरू झाली.
त्यातच आता पृथ्वीराज चव्हाणांनी वर्तवलेल्या अंदाजामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय आणि आधीपासूनच सुरू असलेल्या चर्चांना आणखीच उधाण आलंय.
एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार, मुख्यमंत्री बदलाची निरर्थक चर्चा – फडणवीस
याबाबत प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुख्यमंत्री बदलाची कुठली चर्चा नाही आणि कारणही नाही. जे आमच्या महायुतीतले लोक अशाप्रकारचे वक्तव्य करतायेत, त्यांना माझं अतिशय स्पष्टपणे गोंधळ निर्माण करणं तात्काळ बंद केलं पाहिजे. कारण यातून महायुतीत संभ्रम निर्माण होतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहणार आहेत.
“पृथ्वीराज चव्हाण जे बोलले, तशी पतंगबाजी अनेकजण करतायेत. अनकेजण असे भविष्य वर्तवतायेत. पण त्यांनी कितीही भविष्य सांगितलं, तरी मी स्पष्टपणे सांगतो, ८ तारखेला काही होणार नाही, ९ तारखेला काही होणार नाही. झालंच तर आमचा मंत्रिमंडळ विस्तार होईल. मुख्यमंत्री ठरवतील तेव्हा विस्तार होईल. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच राहतील.”
बोलताना प्रत्येकानं वास्तवाचं भान ठेवलं पाहिजे आणि वास्तव हे आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे आणि तेच राहणार आहेत, असंही फडणवीस म्हणाले