मुंबई : उद्योगपती सज्जन जिंदल यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचा आरोप ठेवला असून या प्रकरणी मुंबई पोलिसांनी FIR नोंदवलं आहे. सज्जन जिंदल हे JSW ग्रुप या उद्योगसमूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.
वांद्रे कुर्ला संकुल (BKC) पोलिस स्टेशनमध्ये 13 डिसेंबर रोजी नोंदवलेल्या FIR नुसार जिंदल यांच्यावर भारतीय दंडविधान कलम 376 (बलात्कार), कलम 354 (महिलेचा विनयभंग करण्याच्या दृष्टीनं तिच्यावर हल्ला करणे) आणि कलम 506 (धमकी) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित महिलेनं दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 2022 मध्ये BKC मध्ये JSW कंपनीच्या मुख्यालातील पेंटहाऊसमध्ये हा गुन्हा घडला.फेब्रुवारी 2022 मध्ये या महिलेनं पोलिसांत तक्रार केली पण पोलिसांनी त्याकडे लक्ष दिलं नाही असा दावा या महिलेनं केला आहे. त्यामुळे ही महिला कोर्टात गेली आणि कोर्टाच्या आदेशानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात FIR नोंदवलं आहे.
या FIR मध्ये पिडीत महिलेचा संपूर्ण जबाब नोंदवला आहे. 30 वर्षांची आणि पेशानं अभिनेत्री असलेली ही महिला मुंबईतल्या जुहूची रहिवासी आहे.ऑक्टोबर 2021 मध्ये दुबईत एक IPL सामना पाहायला गेली असता, तिथे स्टेडियमच्या व्हीआयपी बॉक्समध्ये तिची आरोपीसोबत पहिल्यांदा भेट झाली. पीडित महिलेचा भाऊ दुबईत रियल इस्टेट सल्लागार आहे. तिनं म्हटलं आहे की “जिंदल यांना जागा विकत घ्यायची असल्यानं त्यांनी त्यांचा फोन नंबर दिला. मुंबईत आल्यावर मी 13 डिसेंबर 2021 रोजी त्यांना औपचारिक संदेश पाठवला.”
18 आणि 19 डिसेंबरला जयपूरमध्ये खासदार प्रफुल पटेल यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात दोघांची पुन्हा भेट झाली आणि दोघांमध्ये संवाद सुरू झाला. जयपूरमधल्या भेटीत सज्जन जिंदल जवळीक दाखवू लागले, त्यानंतर ते मला ‘बेब,’ ‘बेबी’ अशा नावांनी हाका मारू लागले आणि आम्ही हॉटेलमध्ये भेटावं अशी मागणी करू लागले असा दावा या महिलेनं केला आहे.जिंदल यांनी त्यांच्या पत्नीसोबत नात्यामध्ये समस्या असल्याचं वर्णन केलं, जे ऐकून तिला काहीसं विचित्र वाटलं. त्या पुढच्या भेटींमध्ये जिंदल यांनी आपल्या रोमँटिक भावना व्यक्त केल्या आणि ते स्वतः विवाहीत असतानाही पिडीत महिलेसोबत शारीर संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र आपण त्यास विरोध केला आणि केवळ लग्न झाल्यावरच असे संबंध ठेवू असं स्पष्ट केल्याचं तिनं सांगितलं आहे.