महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 30 एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेची हजारो प्रवेश पत्रं (हॉल तिकीट) लीक झाल्याचं समोर आलं आहे. गट ब आणि गट क संयुक्त प्रवेश परीक्षेच्या प्रवेश पत्रिकांची एक टेलिग्राम लिंक व्हायरल होत आहे. यामुळे MPSC पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे.
टेलिग्राम ॲपवरील एका चॅनेलवर या परीक्षेला बसणाऱ्या सुमारे 90 हजार उमेदवारांची हॉल तिकिटं लीक झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तसंच परीक्षेची प्रश्नपत्रिका असल्याचा दावाही या चॅनेलवर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ह्या संदर्भातील पोस्ट व्हायरल होत असून उमेदवारांच्या हॉल तिकीटाची यादी मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे.
येत्या 30 तारखेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त प्रवेश पूर्व परीक्षा नियोजित आहे. परंतु आज सकाळी 23 एप्रिलला अचानक समाज माध्यमांवर या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटं व्हायरल होऊ लागली.
काही विद्यार्थी संघटनांनी याची माहिती देखील घेतली. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, एका टेलिग्राम चॅनेलवर या परीक्षेला बसलेल्या काही हजारो विद्यार्थ्यांचा डेटा लीक झाला असून त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका असल्याचाही दावा करण्यात येत आहे. संबंधित टेलिग्राम चॅनेलची लिंक सुद्धा व्हायरल झाल्याचं सांगितलं जात असून विद्यार्थ्यांचा डेटा लिक झाल्याने विद्यार्थी वर्गात खळबळ उडाली.
महाराष्ट्रात सातत्याने स्पर्धा परीक्षांच्याबाबतीत त्रुटी राहिल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप होत असल्याचं चित्र आहे. आता पुन्हा एकदा ऐन परीक्षेच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर सडकून टीका केली जात आहे.
विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनीही या प्रकरणात चौकशीची मागणी केली आहे. ते म्हणाले, “हा अत्यंत गंभीर प्रकार आहे, प्रश्नपत्रिका लीक होत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. कोणाचंही सरकार असो या गोष्टी बदलताना दिसत नाहीत. या कारभाराला प्रशासन जबाबदार असल्याचं स्पष्ट आहे. सत्ताधाऱ्यांनी संबंधित दोषींवर कारवी करावी.”
यासंदर्भात राष्ट्रवादी युथ काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सरकारवर टीका केली आहे. लीक झालेल्या हॉल तिकीटांची यादी ट्वीट करत सूरज चव्हाण यांनी हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोषींवर तात्काळ कारवाई करावी आणि संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवी अशी मागणीही सूरज चव्हाण यांनी केली.
टेलिग्रामच्या एका चॅनेलवर हॉल तिकिट प्रसिद्ध होत असल्याचं निदर्शनास येताच आता यासंदर्भात लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.
या पत्रकामध्ये म्हटल्यानुसार, 30 एप्रिलच्या परीक्षेसाठी नियोजित विषयांकित परीक्षेची प्रवेश पत्रं म्हणजेच हॉल तिकीटं आयोगाने 21 एप्रिल रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारा उपलब्ध करून दिली होती. तसंच या बाह्यलिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेली हॉल तिकिटं एका टेलिग्राम चॅनेलवर प्रसिद्ध होत असल्याचं निदर्शनास आल्याचंही आयोगाने स्पष्ट केलं आहे.
आता आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ह्या बाह्यलिंकवर हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यीची सुविधा बंद करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या बाह्यलिकंवरील विद्यार्थ्यांची हॉल तिकीट वगळता इतर डेटा लीक झाला नसल्याचं आयोगाने म्हटलं आहे. म्हणजेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा डेटा लिक झाल्याचंही आयोगाने मान्य केलं आहे. संबंधित टेलिग्राम चॅनेलकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध नसल्याचंही आयोगाने स्पष्ट केलं आहे.