मुंबई : उत्तर भारतात हवामान आपला मूड बदलत असल्याने परत एकदा थंडी परतण्याची शक्यता आहे. एक फेब्रुवारीपासून उत्तर भारतातील मैदानी भागात सहा दिवस पाऊस पडणार आहे, तर डोंगराळ राज्यांमध्ये ५ दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्रात फेब्रुवारीमध्ये कोकणासह संपूर्ण राज्यात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आलाय. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय महापात्रा यांनी फेब्रुवारी महिन्यातील तापमान आणि पावसाचा अंदाज वर्तवलाय. देशाच्या बहुतांशी भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलंय.
या राज्यांमध्ये पावसाचा इशारा
१ ते ३ फेब्रुवारी दरम्यान दोन नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स येणार आहेत, असे हवामान विभागाकडून सांगितले आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये ५ फेब्रुवारीपर्यंत पाऊस पडू शकतो. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये १ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान पाऊस होण्याची शक्यता आहे. तर हरियाणा आणि पंजाबमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान पाऊस होईल असा इशारा देण्यात आलाय. तर दक्षिण भारताच्या राज्यातही तामिळनाडू, कराईकल, केरळमध्ये २ फेब्रुवारीपर्यंत पाऊस होईल असा अंदाज आहे. आजपासून अर्थात १ फेब्रुवारीला पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये पावसाची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबादमध्ये ३,५ आणि ६ तारखेदरम्यान पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. दिल्लीत २ फेब्रुवारीपर्यंत हवामान ठीक राहील पण ३ फेब्रुवारीला पाऊस पडू शकतो अंदाज आहे. तर वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील अनेक भागात सातत्याने ढगाळ हवामान दिसत आहे.
त्यामुळे थंडी कमी होती. जानेवारीत थंडी कमी जाणवल्याने फेब्रुवारी महिन्यात थंडी चांगली, राहील अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये २ फेब्रुवारीपर्यंत दाट धुके कायम राहू शकते. या ठिकाणी सकाळी आणि रात्री धुके असतं.