आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य दीपस्तंभासारखे -स्नेहलताताई कोल्हे

0

येसगावातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी 

कोपरगाव : शिक्षण हाच समाजजागृतीचा आणि सर्वांगीण विकासाचा पाया आहे, हे ओळखून डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी निरपेक्ष भावनेने शिक्षण क्षेत्रात काम केले. समाजातील अज्ञान व दारिद्रय समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून गोरगरीब शेतकरी पददलित, बहुजन समाजाच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवली. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत कर्मवीरांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे. रयत शिक्षण संस्थेच्या वाढीत कर्मवीर भाऊराव पाटील यांना साथ देणारे माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी कर्मवीरांना साजेसे कार्य केले, असे प्रतिपादन कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी केले. 

कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शुक्रवारी (२२ सप्टेंबर) थोर समाजसुधारक, शिक्षणप्रसारक आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी स्नेहलताताई कोल्हे यांनी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. याप्रसंगी सखाराम महाराज कर्डिले, गोरख आहेर, सरपंच पुंडलिक गांगुर्डे, उपसरपंच संदीप गायकवाड, शैलेंद्र पंडोरे, दगडू दरेकर, सचिनदादा कोल्हे, शिवाजीराव कोकाटे, सुधाकर कुलकर्णी, बाळासाहेब निकोले, डी. एल. शिंदे,  अतुल सुराळकर, किरण गायकवाड, दत्तात्रय आहेर, अॅड. उत्तमराव पाईक, शंकरराव पाईक, रवींद्र कळसकर आदींसह शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांचा स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, लोकशाहीचा मूळ गाभा लोकशिक्षण हे आहे आणि हे लोकशिक्षण समाजाला विकासाकडे नेते हे जाणणारे व ग्रामीण शिक्षण चळवळीचे जनक म्हणजे शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील होत. ‘शिक्षण हेच कर्म आणि समाजसेवा हाच धर्म’ हा संदेश देऊन आपले संपूर्ण आयुष्य शैक्षणिक कार्यासाठी खर्ची घालणाऱ्या डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ अशी घोषणा करून श्रमाच्या मोबदल्यात मोफत उच्च शिक्षण गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दिले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातील दारिद्य्र जवळून पाहिले होते. त्यामुळे त्यांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून आपल्या संस्थेत ‘कमवा व शिका’ ही योजना राबवून, ‘श्रम करा व शिका’ हा मंत्र देऊन गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा व स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी रयत शिक्षण संस्थेचा विस्तार करण्यात कर्मवीर अण्णांना मोलाची साथ दिली. स्व. कोल्हेसाहेबांनी कोपरगाव तालुक्यात व नगर जिल्ह्यात ‘रयत’ च्या शाळांना उभारी दिली. गोरगरीब व शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी कोपरगावात संजीवनी शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेत शिकलेले विद्यार्थी आज देश-विदेशात उच्च पदांवर कार्य करून नावलौकिक वाढवत आहेत याचा मनस्वी आनंद वाटतो.

ज्यांच्या निष्काम आणि निरलस सेवेने शिक्षण प्रसारातून जनजागृतीबरोबर समाजात वैचारिक क्रांती घडत गेली अशा ध्येयवादी, दूरदृष्टीच्या व क्रियाशील महापुरुषांमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अग्रक्रमाने समावेश होतो. सेवेच्या, त्यागाच्या व कष्टाच्या बळावर महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या असंख्य लोकांना अज्ञानाच्या शृंखलेतून मुक्त करणारा महात्मा म्हणजे डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील होत. त्यांच्या अद्वितीय कार्यामुळे आज शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात वाहत आहे. त्यातून लाखो मुलांनी चांगले शिक्षण घेऊन देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. कर्मवीरांनी लावलेल्या रयत शिक्षण संस्थारूपी रोपट्याचे खऱ्या अर्थाने वटवृक्षात रूपांतर झाले आहे. स्वत:च्या संसाराची होळी करून दीनदलितांसाठी, अठरा पगड जातींसाठी शिक्षणाची शिदोरी उपलब्ध करून देणाऱ्या कर्मवीरांचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत. शिक्षणामध्ये शारीरिक श्रमाची प्रतिष्ठा प्रस्थापित करण्याचा यशस्वी प्रयत्न भाऊरावांनी केला. त्यांच्या शिक्षण प्रणालीत स्वाभिमान, समता, स्वावलंबन आणि श्रमप्रतिष्ठा या चतु:सूत्रीचा समावेश असल्यामुळे ‘रयत’ मध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडलेले असंख्य युवक व युवती आज स्वाभिमानाने जीवन जगत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य असेच अखंडपणे चालू राहिले पाहिजे, असेही स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here