आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत कुणाल दराडे यांनी घेतली उपोषणकर्ते जरांगे यांची भेट!

0

येवला प्रतिनिधी 

 मराठा समाजाला आरक्षण मिळावे या न्याय मागणीसाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे- पाटील यांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी आज भेट घेऊन आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहे. या ठिकाणी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या हल्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. त्यातच राज्यभरातील मराठा समाज बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही भूमिका घेत असून ठिकठिकाणी आंदोलने देखील सुरू आहे.या पार्श्वभूमीवर

कुणाल दराडे यांनी जरांगे पाटील यांची आज भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करत मराठा आरक्षणास पाठींबा दर्शविला.याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थ,समाजाचे पदाधिकारी व प्रतिनिधीशी चर्चा करून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पाठिंबा व्यक्त केला. श्री.जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपोषण स्थळीच सलाईन देखील लावलेले आहे.दिवसेंदिवस प्रकृती खालावत असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीचा विचार करून सरकारने वेगाने पावले उचलून आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी दराडे यांनी केली.

मागील चार ते पाच वर्षापासून आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. वेळोवेळी आंदोलने ही झाली आहे. तथापि,आजही मराठा समाजामध्ये सर्वच बांधव प्रगत नसून ग्रामीण भागातील अनेक मराठा बांधव आजही हलाखीचे जीवन जगत असून सामाजिक व आर्थिकदृष्ट्या त्यांचे मागासलेपण दिसून येते. किंबहुना,या समाजाला देखील सरकारच्या विविध सवलतींच्या लाभाची गरज आहे.त्यामुळे शासनाने सकारात्मक पावले उचलून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मार्ग काढावा,जरांगे पाटील यांचे उपोषण व राज्यातील आंदोलनाची दखल घ्यावी,अशी मागणी श्री. दराडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.तसेच येथील आंदोलनातील सहभागी समाज बांधवाची कोणत्याही प्रकारची चूक नसताना लाठीहल्ला झाला असून त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहे.सदरचे गुन्हे देखील मागे घेऊन त्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी दराडे यांनी केली आहे.यावेळी डॉ.विलास कांगणे,मकरंद तक्ते आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here