इंडोनेशियामध्ये शनिवारी (०१ ऑक्टोबर) फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या उसळलेल्या हिंसाचार आणि चेंगराचेंगरीत१५३ जण ठार तर १८० जखमी हुन अधिक व्यक्ती जखमी झाल्याची घटना घडली . एका संघानं सामना हरल्यानंतर चाहते संतप्त होऊन मैदानात उतरल्यानंतर हिंसाचार उसळला. पूर्व जावा प्रांतातील अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुरबाया यांच्यात सामना सुरू होता. अरेमा एफसीचा पराभव होताना पाहून त्यांचे चाहते मैदानात उतरू लागले. बेशिस्त जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधूराच्या नळकांड्या फवारण्यात आल्या. या गोंधळात स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी झाली.
वृत्तसंस्था एएफपीनं इंडोनेशियाच्या पूर्व जावा प्रांताचे पोलीस प्रमुख निको अफिंटा यांचा हवाला देत सांगितलं की, आपला संघ सामना हरत असताना काही चाहते फुटबॉल खेळपट्टीच्या दिशेनं धावले आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना परिस्थिती अनियंत्रित झाली.
ते म्हणाले, “मैदानात भांडणं आणि गोंधळ उडाला होता. मैदानात ३४ जणांचा मृत्यू झाला तर इतर लोकांचा रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे.”
देशाच्या मुख्य सुरक्षा मंत्र्यांनी सांगितलं की, स्टेडियममध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रेक्षक होते. स्टेडियममध्ये क्षमतेपेक्षा जवळपास ४,००० अधिक प्रेक्षक होते.
देशाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी तपास पूर्ण होईपर्यंत इंडोनेशियातील फुटबॉल लीगचे सर्व सामने थांबवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेचे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
इंडोनेशियाच्या फुटबॉल असोसिएशनने (PSSI) शनिवारी रात्री उशिरा एक निवेदन जारी करत या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक टीम इथं पाठवण्यात आली आहे.
“अरेमाच्या समर्थकांनी कंजरुहान स्टेडियमवर जे केलं त्याबद्दल PSSI खेद व्यक्त करत आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आणि बाधित झालेल्यांच्या कुटुंबीयांची आम्ही माफी मागतो. याची चौकशी करण्यासाठी PSSI नं तातडीने एक पथक तयार केले असून ते मलंगकडे रवाना झाले आहे.”
दरम्यान, दंगलसदृश परिस्थिती पाहता फुटबॉल लीगनं सामने आठवडाभरासाठी पुढे ढकलले आहेत. या घटनेत 180 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अरेमा एफसीवर या हंगामासाठी बंदी घालण्यात आली आहे.
सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचे आदेश
वृत्तसंस्था रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, जैनुद्दीन अमाली यांनी शनिवारी सांगितलं की, फुटबॉल सामन्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सध्या प्रेक्षकांना सामन्याच्या ठिकाणी जाण्याची परवानगी नाही.
इंडोनेशियन फुटबॉल असोसिएशननेही या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचं सांगितलं. ते म्हणाले, “या घटनेमुळे इंडोनेशिया फुटबॉलची प्रतिमा मलिन झाली आहे.”
दरम्यान, इंडोनेशियन फुटबॉलची शीर्ष लीग बीआरआय ही एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. इंडोनेशियामध्ये यापूर्वीही फुटबॉल सामन्यांदरम्यान वेगवेगळ्या क्लबच्या समर्थकांमध्ये हिंसक घडामोडी घडल्या आहेत. इथं फुटबॉल स्पर्धा काहीवेळा हिंसक रूप घेते.