इचलकरंजी : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब, गरजू नागरिकांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी व्हिजन इचलकरंजीतर्फे शनिवारपासून सुरू झालेल्या ‘ माणुसकीची भिंत’ या उपक्रमास नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला.सकाळपासूनच नागरिकांकडून कपडे जमा करण्यात आले. जमा झालेले कपडे सायंकाळच्या सुमारास कोल्हापूर येथील एकटी या संस्थेला तसेच काही गोरगरीब व गरजूंपर्यंत वाटप करण्यात सुरुवात झाली. गरजूंच्या चेहऱ्यावर हसू उमटत आहे.
कोल्हापूरनंतर इचलकरंजीत व्हिजन इचलकरंजी या संस्थेतर्फे २०१६ पासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘नको असेल ते द्या व हवे असेल तर ते घेऊन जा’ या घोषवाक्याखाली हा उपक्रम राबविला जात आहे. शनिवार व उद्या रविवारपर्यंत व्यंकटराव हायस्कूल येथे नागरिक कपडे जमा करत आहेत. व्हिजन सदस्यांसह व्यंकटराव हायस्कूलमधील कर्मचाऱ्यांचेही सहकार्य मिळत आहे. संघटनेचे अध्यक्ष कौशिक मराठे, उपाध्यक्ष इराण्णा सिंहासने, अमित कुंभार, विजय कुडचे, पवन टिबरेवाल, सचिन कांबळे, सचिन सादळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.