उरण दि. ११ (विठ्ठल ममताबादे )आपले संपूर्ण आयुष्य उरण नगर परिषदेत कार्यरत राहून जनतेची सेवा करणा-या व नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सध्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.सेवानिवृत कर्मचाऱ्यांच्या अनेक विविध मागण्या प्रलंबित असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याला (प्रत्येक महिन्याला) १ तारखेला करणे व सातवा वेतन आयोगाची थकबाकी सेवानिवृत कर्मचाऱ्यांना वेळेवर दयावे या दोन प्रमुख मागण्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आहेत.
शासनाने परिपत्रक (G.R) काढून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन, पगार, ७ वा वेतनाचा हप्ता वेळेवर द्यावे असे आदेश प्रत्येक शासकीय विभागाला दिले आहेत मात्र असे असतानाही शासनाच्याच निर्णयाला केराची टोपली दाखविण्याचा कारभार शासकीय कार्यालयामार्फतच होत असल्याची बाब उघडकीस आली आहे. उरण नगर परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन,पगार,सातवा वेतन आयोगाचा हप्ता मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. उरण नगर परिषदेमध्ये एकूण १२० हून जास्त सेवानिवृत्त कर्मचारी आहेत.मात्र वेळेवर वेतन, पगार , ७ वा वेतनाचा हप्ता मिळत नसल्याने सदर सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी एकत्र येत महाराष्ट्राचे प्रधान सचिव, मंत्रालय,मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पालकमंत्री, उरण नगर परिषद आदी ठिकाणी कायदेशीर व शांततेच्या मार्गाने पत्रव्यवहार देखील केला. सदर बाब शासनाच्या निदर्शनास सुध्दा आणून दाखविली. वेळोवेळी शासनाला कळविले तरीही उरण नगर परिषदेच्या सेवानिवृत कामगारांना न्याय मिळत नसल्याने सेवानिवृत कर्मचाऱ्यांनी शासनाच्या या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. वेळेवर वेतन मिळत नसल्याने तसेच सातवा वेतन आयोगाच्या फरकाची हप्ता वेळेत मिळत नसल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदेशीर व शांततेच्या मार्गाने पत्रव्यवहार करून सुद्धा न्याय मिळत नसल्याने उरण नगर परिषदेच्या सेवानिवृत कर्मचा-यांनी न्याय न मिळाल्यास उरण नगर परिषदेच्या गेटसमोरच आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.