उरण दि 24 (विठ्ठल ममताबादे )उरण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी राहुल इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली असून,त्यांनी काल सायंकाळी आपल्या पदाचा पदभार स्विकारलाआहे.उरण नगरपरिषदेचे या आधीचे मुख्याधिकारी संतोष माळी
यांनी दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.त्यांची बदली 20 सप्टेंबर 2022 रोजी माणगाव येथे करण्यात आली आहे.त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर माणगाव येथील नगरपंचायतीमध्ये काम करीत असलेले राहुल इंगळे यांची काल 22 सप्टेंबर 2022 रोजी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी सायंकाळी 6:00 वाजता पदभार स्विकारला आहे.
उरण तालुक्यात कार्यरत असलेले केंद्र व राज्य सरकारचे एनएडी करंजा,जेएनपीए, बीपीसीएल,ओएनजीसी व वायू विद्युत केंद्र यासह विविध विकसनशील प्रकल्प आणि त्या अनुषंगाने तालुक्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढलेले नागरीकरण व त्यासाठी लागणारी बाजारपेठ उरण शहरातील अत्यंत छोटी बाजारपेठ असल्याने त्याचा ताळमेळ बसत नाही.याशिवाय मोठ्या प्रमाणात वाढलेल्या नागरीकरणामुळे सणासुदीला उरण बाजारपेठेत होणारी प्रचंड वाहतूक कोंडीच्या प्रश्नाचे मोठे आव्हान नवनिर्वाचित मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या समोर आहे.त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उरण बाह्यवळण रस्त्याच्या नियोजित निर्मितीसाठी लक्ष घालून लवकरात-लवकर प्रयत्न करून मार्गी लावणार असल्याचे मुख्याधिकारी इंगळे यांनी सांगितले.