संगमनेर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्तासेलच्या राज्य सरचिटणीस सौ.अमृता अनिल कोळपकर यांनी ऊसतोड मजुरांचे औक्षण करून भाऊबीज साजरी केली. यावेळी ऊसतोड मजुर भारावून गेले होते.
सध्या कारखान्यांचे धुराडे पेटले असून गळीत हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक ऊसतोड मजूर ऐन दिवाळीत आपले घरदार सोडून ऊस तोडण्यासाठी विविध गावात दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांची दिवाळी आणि भाऊबीज साजरी झालीच नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्ता सेलच्या राज्य सरचिटणीस सौ.अमृता अनिल कोळपकर यांनी भाऊबीजेच्या दिवशी तालुक्यातील पठार भागातील साकुर या गावी ऊसतोड मजुरांच्या अड्ड्यावर जात ऊसतोड बांधवांचे औक्षण करत त्यांना खोबऱ्याची वाटी आणि करदोरा भेट दिला
सौ.अमृता कोळपकर यांच्या या भाऊबीजेने उपस्थित ऊस तोडणी मजूर भारावून गेले. एरवी वर्षातला मोठा सण असणारी दिवाळी आणि भाऊबीज उसाच्या फडात साजरी करणाऱ्या या ऊस तोडणी कामगारांच्या चेहऱ्यावर या अनोख्या भाऊबीजेमुळे आनंद ओसंडून वाहत होता. गतवर्षी देखील कोळपकर दांपत्याने साकुर येथील ऊसतोड मजुरांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप केले होते. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.