विविध विकासकामे अपूर्ण असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण;लेखी आश्वासनाशिवाय पाठीमागे न हटण्याचा निर्णय.
उरण दि ५ (विठ्ठल ममताबादे ) ; बहुचर्चित शिवडी – न्हावा शेवा लिंकचे (महामार्गाचे )काम पूर्ण झाले असून या शिवडी न्हावा शेवा लिंक (अटल सेतू मार्ग)चे उदघाटन शुक्रवार दि १२ जानेवारी २०२४ रोजी भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.सुमारे २१ हजार २०० कोटी रुपये खर्चाच्या आणि २२ किलोमीटर लांबीच्या ‘शिवडी न्हावाशेवा अटल सेतू’ उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे.मात्र हे सेतू (मार्ग) मुंबई येथून सुरु होउन रायगड जिल्हयातील उरण तालुक्यातील चिर्ले गाव येथे संपणार आहे.
चिर्ले ग्रामपंचायत हददीत या मार्गाचा समारोप होणार आहे. शिवडी न्हावा अटल सेतू हा प्रकल्प राबविताना एमएमआरडीए प्राधिकरणाने व महाराष्ट्र शासनाने चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सर्व विकासकामे पूर्ण करण्याचे व नुकसानग्रस्त बाधितांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र एमएमआरडीए व महाराष्ट्र शासनाने दिलेले वचन न पाळल्याने तसेच ग्रुप ग्रामपंचायत चिर्ले व चिर्ले ग्रामस्थांची मोठी फसवणूक केल्याने एमएमआरडीए अणि महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यासाठी विविध विकासकामे पूर्ण व्हावीत या मागणीसाठी ग्रुप ग्रामपंचायत चिर्ले व ग्रामस्थांतर्फे शुक्रवार १२ जानेवारी २०२४ रोजी अटल सेतूचा जिथे मार्ग संपतो त्या चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील मार्गालगत जन आंदोलन करण्यात येणार आहे.
जन आदोलन करण्यासंदर्भात ग्रुप ग्रामपंचायत चिर्ले व ग्रामस्थांतर्फे रायगड जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग, पोलिस आयुक्त कोकण भवन, पोलिस उपायुक्त परिवहन २, सहाय्यक पोलीस आयुक्त न्हावा शेवा, तहसिलदार उरण, पोलीस स्टेशन उरण आदी ठिकाणी पत्रव्यवहार सुध्दा करणात आला आहे.या संदर्भात चिर्ले ग्रुप ग्रामपंचायतचे विदयमान सरपंच सुधाकर भाउ पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की चिर्ले ग्रामपंचायत हद्दीत चिर्ले बाकावली तलावाचे सुशोभिकरण करणे, मौजे गावठाण, चिर्ले जिल्हा परिषद रस्ता ते NH-4B हायवे पर्यंत आरसीसी नाला बांधणे, एम एम आर डी ए मधील प्रोजेक्ट मध्ये स्थानिकांची नोकरभरती करणे, चिर्ले बाकावली तलाव ते NH 4B हायवे पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे. गावठाण स्मशान भूमी ते जाभूळपाडा बसस्टॉप पर्यंत काँक्रीटीकरण करणे,ग्रामपंचायत अंतर्गत गटारे व काँक्रीट रस्ते बनविणे आदी मागण्यांबाबत ग्रुप ग्रामपंचायत चिर्ले व ग्रामस्थांमार्फत एमएमआरडिए व महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केला मात्र प्रशासनाने ग्रुप ग्रामपंचायत चिर्ले व ग्रामस्थांच्या मागणीची साधी दखल घेतली नाही.
एमएमआरडीए किंवा महाराष्ट्र शासनातर्फे कोणतेही लेखी आश्वासन मिळाले नाही. कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. ग्रुप ग्रामपंचायत चिर्ले व ग्रामस्थांची ही घोर फसवणूक आहे. त्यामूळे झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शुक्रवार दि १२ जानेवारी २०२४ रोजी शिवडी न्हावा शेवा सागरी मार्ग (अटल सेतू )चिर्ले, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे मोठे जन आंदोलन करण्यात येणार आहे. जमीन बचाव संघर्ष समिती तसेच अनेक विविध सामाजिक संस्था, संघटनांचा यात सहभागी होणार आहेत. आतापर्यंत कोणत्याही शासकीय विभागाने किंवा शासकीय अधिकाऱ्याने लेखी आश्वासन दिलेले नाही. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. असे सरपंच सुधाकर पाटील यांनी सांगितले.जनतेच्या कल्याणासाठी हा जन आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. होणाऱ्या परिणामास शासनच सर्वस्वी जबाबदार असेल अशी आक्रमक भूमिका सरपंच सुधाकर भाऊ पाटील, ग्रामपंचायत चिर्ले व ग्रामस्थांनी घेतली आहे.