एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री शिंदे यांचे भाष्य; आंदोलनाची तीव्रता राज्यभर

0

पुणे  : काही दिवसांवर गणपती सण आला असतानाच राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवार (ता.३) आंदोलन सुरू केले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन लागू करण्यासह अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
यामुळे राज्यभरातील अनेक जिल्ह्यात एसटी सेवा बंद झाली आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी आंदोलनावर भाष्य करताना, एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन केले आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन लागू करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात आली होती. तसेच मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे धरणे आंदोलने करण्याचा इशारा दिला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेण्याचे आश्वासन देऊनही बैठक न लागल्याने राज्यभरातील एसटी कर्मचारी आक्रमक झाले. त्यानंतर आता कृती समितीच्या वतीने राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

यावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल बुधवारी बैठक बोलवली असून याआधीही एक बैठक पार पडल्याचे म्हटले आहे. तसेच एसटी गावोगावी जाणारी असल्याने उद्याच बैठक बोलावण्यात आली आहे. यात सकारात्मक चर्चा होईल. गणेशोत्सव जवळ आल्याने सर्वसामान्य एसटीचा वापर करतात. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी संप करू नये. सकारात्मक चर्चा करूनच प्रश्न सुटेल, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

हे आगार बंद

एसटी कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनामुळे राज्यातील एसटी वाहतूक विस्कळीत झाली असून बहूतेक जिल्ह्यात एसटीची चाके थांबली आहेत. लातूर नांदेड, छ. संभाजीनगर, नगर, अकोल्यात आगार पुर्णतः बंद आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती, तळेगाव आगारातही एसटी थांबण्यात आल्या आहेत. तर सांगली जिल्ह्यात मिरज, जत, पलूससह साताऱ्यातील , वडूज, महाबळेश्वर हे आगार पूर्णतः बंद आहेत. नाशिक जिल्ह्यासह जळगावच्या भुसावळ, चाळीसगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. नागपुरमधील देखील बस सेवा थांबली आहे.

एसटी सेवा सुरळीत असणारे आगार

तर कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात एसटी सेवा सुरळीत सुरू असून साताऱ्यातील काही आगारात एसटीची वाहतूक व्यवस्थित सुरू आहे.

नेमक्या मागण्या कोणत्या?

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन लागू करावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक द्यावा, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक मिळावा अशा प्रमुख मागण्या एसटी कर्माचाऱ्यांच्या आहेत.
याचबरोबर खाजगीकरण बंद करण्यासह सुधारीत जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती रद्द करा. कर्मचाऱ्यांना मेडीकल कॅशलेस योजना लागू करण्यासह स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा, चालक/वाहक/कार्यशाळा व महीला कर्मचाऱ्यांना अद्यावत व सर्व सुखसोईचे विश्रांतीगृह द्या. वेळापत्रकातील त्रुटी दूर करण्यासह सेवानिवृत्त झालेल्या आणि होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन (पेंशन) द्यावे. यासह कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये वर्षभराचा मोफत प्रवास पास देण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here