दुधेबावी : आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर बरड (ता. फलटण) येथील बागेवाडी पेट्रोल पंपाजवळ कंटेनरच्या धडकेत कारमधील तीन जण ठार झाले. सागर रामचंद्र चौरे (वय ३४, रा. पाडेगाव, ता. खंडाळा), भाऊसाहेब आप्पा जमदाडे (वय ४५, रा. खेड बुद्रुक, ता. खंडाळा), नीलेश चंद्रकांत शिर्के (वय ४०, रा. वेटणे, ता. खटाव. मूळ रा. खटाव, ता. खटाव) अशी मृतांची नावे आहेत. काल पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.
अपघातानंतर कंटेनर चालकाने कंटेनरसह पळ काढला; परंतु राजुरीमध्ये कंटेनर बंद पडल्याने तो जागेवर सोडून चालक पसार झाला आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी, कर्नाटकमधील विजापूरमध्ये बंद पडलेला ट्रक दुरुस्त करण्यासाठी सागर चौरे, भाऊसाहेब जमदाडे व नीलेश शिर्के हे तिघे जण कारमधून (एमएच ५३ ए ०५१४) विजापूरला गेले होते. काम आटोपून ते तिघेही कारमधून माघारी येत होते.
गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास कार बरड गावच्या हद्दीत आली असता पंढरपूरच्या दिशेने वेगाने निघालेल्या कंटेनरने (एमएच ४६ सीएल ९६५१) कारला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर चालकाने कंटेनरसह पळ काढला; परंतु अपघातामध्ये कंटेनरचा रेडीएटर फुटल्याने राजुरी गावाजवळ कंटेनर बंद पडला. त्यामुळे चालकाने कंटेनर जाग्यावरच सोडून पळ काढला.
या अपघाताची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक व त्यांचे सहकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमधील जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलविले; परंतु उपचारापूर्वीच तिघांचाही मृत्यू झाला होता. या अपघाताची फिर्याद सूरज संतोष खरात (रा. पाडेगाव, ता. खंडाळा) यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपात्रे करीत आहेत.