अकोले प्रतिनिधी – येथील श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीचे स्वामी विवेकानंद विद्यालय विरगाव विद्यालयात किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी माय मॉम अँड मी या कार्यशाळेचे डॉ एकता डेरे यांच्या प्रमुख व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. शालेय जीवनात मुलींना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते या अनुषंगाने डॉ डेरे यांनी परखडपणे आपले विचार मांडताना मुलींनी आपली समाजाप्रती जबाबदारी ओळखून वयानुरूप शारीरिक , मानसिक बदल लक्षात घेऊन जीवन आनंदाने जगावे. तसेच एक स्त्री म्हणून आपण विधात्याचे सुंदर फुल असून ज्याप्रमाणे कळीचे रूपांतर फुलात होते . त्याप्रमाणे उद्याची स्त्री म्हणून अनेक जबाबदारी चे ओझे पेलण्याची शक्ती आपल्यात असल्याची जाणीव करून देत आपल्या आई वडिलांच्या संस्काराला कुठेही गालबोट लागू न देता समाजातील चांगले वाईट ओळखायला शिकण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
आपल्या आयुष्याची बाग अपार कष्ट करूनच फुलवा असा मंत्र देत व्यायाम , योग साधना तसेच शारीरिक खेळ आदी बाबींकडे आवड म्हणून पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपले शिक्षण पूर्ण करतांना कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपली स्वतःची ओळख निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील अनेक गोष्टी त्यांनी समजावून सांगत आपले चारित्र्य जपा असा मूलमंत्र त्यांनी दिला.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदर्शन ढगे , जिल्हा परिषद प्राथ. शिक्षिका मिनल चासकर,शरद वाकचौरे, प्रकाश दिघे यांचेसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता वर्पे यांनी तर आभार प्रदर्शन कांचन वाकचौरे यांनी केले