महाआघाडीसह महायुतीचीही वाढणार डोकेदुखी …
शिर्डी /अकोले : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्या उत्कर्षा रुपवते Utkarsha Rupawate यानी वंचित बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांची आज भेट घेतली . त्यांच्या या भेटीतून त्या शिर्डी मतदार संघातून बंडखोरी करीत वंचित कडून उमेदवारी करणार असल्याचे नक्की मानले जात आहे. उत्कर्षा यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीची मात्र डोकेदुखी वाढण्याचे संकेत मिळाले आहेत .
शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी महायुतीकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे . तर महाविकास आघाडीकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिर्डी करिता शेवटपर्यंत कॉंग्रस पक्ष इच्छुक होता . मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या जागेवरील आपला दावा कायम राखला आहे. यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेसच्या नेत्या आणि बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्तीय उत्कर्षा रुपवते या नाराज झाल्या होत्या . त्या बंडखोरी करणार काय याबाबत उलट सुलट चर्चा सुरु असतानाच त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने या चर्चांना आता बळ मिळाले आहे.
उत्कर्षा रुपवते या कॉंग्रेसचे दिवंगत नेते माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांची नात असून दिवंगत नेत प्रेमानंद रुपवते यांच्या कन्या आहेत . शिर्डी लोकसभा मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत . जातीय संख्याबळाच्या राजकारणात भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिल्याने आपल्यावर अन्याय होत असल्याचा रुपवते यांचा आरोप आहे. उत्कर्षा रुपवते या राज्य महिला आयोगाच्या सदस्या आहेत. तसेच काँग्रेसच्या राज्य सरचिटणीस आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या उत्कर्षा रुपवते निकटवर्तीय मानल्या जातात. वंचितच्या तिकिटावर त्या उभ्या राहिल्यास आघाडीची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. शिर्डी मतदारसंघातून जवळपास २ लाखाच्यावर बौद्ध समाजाची असणारी लोकसंख्या विचारात घेता बौद्ध समाजाला उमेदवारी देण्याची समाजाची मागणी आहे. यामध्ये सर्वच पक्षातील कार्यकर्ते आग्रही आहे. आता उत्कर्षा रुपवते काय निर्णय घेतात? या पाहणे महत्वाचे ठरणार आहे.