कोयना’ धरणाची धोकादायक स्थिती……

0

कोयणानगर : कोयना धरणाची  अवस्था दिवसेंदिवस गंभीर व धोकादायक बनत चालली आहे. साठ वर्षांपासूनच्या जुन्या यंत्रणा सडल्या, गंजल्या किंवा काँक्रिटला भले मोठे तडे गेले आहेत.
वीजनिर्मितीसाठी पाणीपुरवठा करणार्‍या यंत्रणाचे स्ट्रक्चरल ऑडिट व त्याचपटीत दुरुस्ती आवश्यक असताना देखील शासन, प्रशासन ही बाब तितक्याशा गंभीरतेने घेत नाही. ‘कोयना वाचवा’ असे अभियान स्थानिकांनाच हातात घ्यावे लागणार, अशीच स्थिती निर्माण होऊ लागली आहे.

तापोळा ते कोयना धरण भिंतीच्या ठराविक अंतरापर्यंतचा सर्व भूभाग कोरडा पडल्यावर जलविद्युत प्रकल्पांना पाणीपुरवठा करणार्‍या यंत्रणाची वस्तुस्थिती समोर आली. पोफळी, अलोरे व कोयना चौथा टप्पा या प्रकल्पांसाठी पाणीपुरवठा करणार्‍या पहिल्या व दुसर्‍या लेक टॅपिंगची जागा, पोफळी टप्पा एक व दोनसाठी पाणीपुरवठा करणार्‍या इंटेक टनेलची अवस्था जवळपास सारखीच आहे. पाण्याखालचा भूभाग व यंत्रणा उघड्या पडल्यावर त्या ठिकाणच्या सुरक्षा भिंतीसह साठ वर्षांपूर्वी केलेले काँक्रिट, लोखंडी फाटक दरवाजांची उघडझाप त्या त्या वेळी न झाल्याने त्यांची सडलेली, गंजलेली अवस्था, आजवर हजारो भूकंपात अंतर्गत काँक्रीटला गेलेले तडे, काँक्रिटची कमी झालेली ताकत व मोठ्या प्रमाणावर चिरा पडल्याने जमिनीत पाणी झिरपण्याचे वाढलेले प्रमाण, अंतर्गत बोगद्यात मोठ्या प्रमाणावर पडलेले मोठे दगड-माती आदींमुळे अनेक ठिकाणी बांधकामाची अवस्था दयनीय झाली आहे.
यापूर्वीच सर्जवेल तथा उल्लोळक विहिरीचा गंभीर प्रश्नदेखील अचानकपणे समोर आला होता. धरणाला भगदाड अशा चर्चांना ऊत आला होता, घटनेचे गांभीर्य समोर आल्यावर शासनाला जाग येऊन त्याची निविदाही काढण्यात आली; मात्र याचीही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

…तर धरण सुरक्षित

धरणांतर्गत यंत्रणा दुरुस्ती होऊन शक्य असेल व छोट्या प्रमाणात काम असेल, तर कमी खर्चात हे काम पूर्णत्वाला नेले जाऊ शकते. व्याप्ती मोठी असेल तर तपासणी अहवाल देऊन त्यासाठी प्रशासकीय तरतुदी करून ज्यावर्षी पाणीसाठा कमी होईल किंवा वेळप्रसंगी या कामासाठी पाणी कमी करून कामे केली, तर निश्चितच धरण सर्वच बाजूंनी सुरक्षित होईल.

धरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

राज्यातील महत्त्वाचे धरण व त्यावर आधारित जलविद्युत निर्मिती प्रकल्प यातून हजारो मेगावॅट वीज व त्याचपटीत सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत असतानाही याठिकाणची अनेक महत्त्वाची शासकीय कार्यालये इतरत्र हलवण्यात आली. अनागोंदीमुळे कोयनेचे महत्त्व आणि महात्म्य कमी झाले, धरणाशी संलग्न
असणारे पूरक प्रकल्प, अनेक कामे निधीअभावी बंद ठेवण्यात आली. नवीन एकाही प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली नाही. धरणांतर्गत अनेक यंत्रणा वर्षांनुवर्षे सडल्या, गंजल्या व कालबाह्य झाल्या असल्या, तरी त्यासाठी अपेक्षित निधी दिला जात नाही. यातूनच कोयनेची  परिस्थिती ही धोकादायक बनत असल्याने शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करावा, असे धरण क्षेत्रा लगतच्या जनतेचे मत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here