सांगली, दि. 29, : संभाव्य टंचाईसदृष्य परिस्थिती लक्षात घेता, कोयना प्रकल्पाच्या पाणीसाठ्यातील वीजनिर्मितीच्या ३५ टीएमसीपैकी १२ टीएमसी पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी आरक्षित करावे, तसेच महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण कायद्यामधील तरतुदीनुसार नदीखोऱ्यातील समन्यायी पाणीवाटपाच्या तरतुदीनुसार सांगली व सोलापूर जिल्ह्याला वेळेत समन्यायी पाणीवाटप व्हावे तसेच वगळलेल्या तालुक्यांचा ट्रिगर २ मध्ये समावेश करण्यासाठी तोडगा काढावा, या ठरावांसह याप्रश्नी मार्ग काढण्यासाठी राज्य स्तरावर उपमुख्यमंत्री तथा पाटबंधारे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सांगली व सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची आठवडाभरात बैठक घ्यावी, असा ठराव कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आज येथे करण्यात आला.
या बैठकीत शेतकऱ्यांना पुरेशी वीज उपलब्ध व्हावी यासाठी आवश्यक यंत्र सामग्री, ट्रान्सफॉर्मरसाठी महावितरण कंपनीस अतिरीक्त निधीची मागणी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही बैठक झाली. या बैठकीस खासदार संजय पाटील, आमदार सर्वश्री गोपीचंद पडळकर, अरूण लाड, अनिल बाबर, विश्वजीत कदम, विक्रमसिंह सावंत, शहाजी पाटील, समाधान आवताडे, आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जलसिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे, माजी आमदार प्रशांत परिचारक व दीपक साळुंखे पाटील, विशाल पाटील, शिवानंद पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. तर दूरदृष्यप्रणालीद्वारे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते.
टेंभू, ताकारी व म्हैसाळ या उपसा सिंचन योजनांच्या रब्बी व उन्हाळी हंगाम सन २०२३ – २४ साठी सांगली व सोलापूर जिल्ह्यासाठी कालवा सल्लागार समितीची ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे वार्षिक पाणी नियोजन करण्यात आले. तसेच, मागील हंगामाच्या पीआयपी अनुपालनांचा आढावा आणि चालू हंगामातील पाण्याच्या नियोजनाबद्दल चर्चा करण्यात आली.
कोयना धरणाचा दि. १५ ऑक्टोबर रोजीचा पाणीसाठा लक्षात घेता, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यासाठी पाणीवापराचे एकत्रित धोरण निश्चित करण्यात येते. यामध्ये तूट, आगामी वर्षातील टंचाईसदृष्य परिस्थिती लक्षात घेऊन पाणीवापराचे नियोजन करण्यात येत असल्याचे सी. एच. पाटोळे यांनी यावेळी सांगितले. त्यांनी केलेल्या सादरीकरणात सांगली जिल्ह्यातील पर्जन्यमान, पाणीसाठे, टेंभू, ताकारी व म्हैसाळ या उपसा सिंचन योजनांची माहिती, प्रकल्पनिहाय मंजूर पाणीवापर, प्रकल्पीय सिंचन क्षेत्र/सिंचन क्षमता, सन २०२२-२३ मधील प्रत्यक्ष पाणी वापर, खरीप/टंचाई आवर्तन २०२३-२४ मध्ये तालुकानिहाय देण्यात आलेले पाणी, सन २०२३-२४ मधील रब्बी हंगाम/उन्हाळी हंगाम साठी प्रस्तावित पाणीवापर, रब्बी व उन्हाळी आवर्तन नियोजन, सिंचन योजना आकारणी, वसुली व थकबाकी, वीजदेयक या बाबींचा आढावा घेण्यात आला.