खाजगी साखर कारखान्यांशी स्पर्धा करण्यासाठी बदल करावे लागतील – आ. आशुतोष काळे काळे साखर कारखान्याच्या साखरेचा ब्रँड तयार करणार :आ. काळे

0

कर्मवीर काळे कारखान्याचा ६८ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न

                     कोळपेवाडी वार्ताहर – मागील काही वर्षात राज्यातील खाजगी साखर कारखान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून जेवढे सहकारी साखर कारखाने तेवढेच खाजगी साखर कारखाने निर्माण झाले आहेत. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांना खाजगी साखर कारखान्यांशी स्पर्धा करावी लागत आहे. भविष्यात नवीन आवाहनांना सामोरे जातांना कार्यक्षमता व व्यावसायिकता यांची कास धरून सहकारी साखर कारखानदारी टिकविण्यासाठी सतत जागृत व सतर्क राहावे लागणार आहे. खाजगी साखर कारखान्यांशी स्पर्धा करण्यासाठी व्यवस्थापन प्रणालीत भरीव व सकारात्मक बदल करावे लागतील असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे. तसेच लवकरच कर्मवीर काळे साखर कारखान्याच्या द्वारे उत्पादित दर्जेदार साखरेचा ब्रँड तयार करणार असल्याची घोषणाही आ. काळे यांनी यावेळी केली

                 कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा २०२२/२३  या वर्षाच्या ६८ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे मार्गदर्शक व जेष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अलकाताई बोरनारे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून करण्यात आला याप्रसंगी आ. आशुतोष काळे बोलत होते.

 पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, मागील दोन वर्षापासून राज्यात उसाचे क्षेत्र वाढत आहे व साखर कारखानदारी देखील वाढली आहे. मात्र दुसरीकडे ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांची संख्या मात्र दिवसेंदिवस घटत चालली आहे. त्यामुळे यापुढील काळात ऊस तोडणी यंत्राची गरज भासणार आहे. भविष्यात पुढील पाच वर्षात कमीत कमी २५ टक्के उसाची तोडणी ही केन हार्वेस्टरने करावी लागणार आहे. तोडणी अभावी शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहिला तर राज्य सरकारला नुकसान भरपाई द्यावी लागते हे टाळण्यासाठी व शेतकऱ्यांचा ऊस वेळेत तोडला जावा यासाठी ज्याप्रमाणे केन हार्वेस्टर साठी यापूर्वी राज्यशासन अनुदान देत होते त्याप्रमाणे विद्यमान राज्य शासनाने अनुदान देण्यासाठी सकारात्मक विचार करावा.

चालू हंगामात राज्यामध्ये १४ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्र गाळपास उपलब्ध असून हेक्टरी सरासरी टनेज ९५ मे. टन गृहीत धरून १३८ लाख टन साखर उत्पादन होईल असा साखर आयुक्तालयाचा अंदाज आहे. त्याप्रमाणे कारखान्याने देखील ७.५० लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. हवामान खात्याकडून ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाचा अंदाज सांगितला असून अजूनही पाऊस सुरूच आहे आजही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलेले आहे त्यामुळे ऊस तोडणीसाठी अडचणी निर्माण होणार आहे. हंगाम लांबला तर उन्हाळ्यात ऊस तोडणी मजुरांचा प्रश्न निर्माण होईल अशा दुहेरी संकटाचा हा गळीत हंगाम आहे.

सर्वच शेतकऱ्यांची को -२६५ या ऊस जातीला पसंती असून हा ऊस परिपक्व होण्यासाठी १३ ते १४ महिने कालावधी लागत असल्यामुळे गळीत हंगाम सुरू करतांना परिपक्व ऊसाचा प्रश्न निर्माण होतो. जास्तीत जास्त ऊस उत्पादना बरोबरच साखर उतारा देखील तेवढाच महत्वाचा आहे त्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारीचे हित दडलेले आहे त्यासाठी ज्या शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता आहे त्या शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवड करावी व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ने प्रसारित केलेल्या नवीन उसाच्या १८१२१ सारख्या ऊसाची लागवड करावी असे आवाहन केले. कारखान्याचा गळीत हंगाम सुरु करतांना पहिल्या टप्प्यातील आधुनिकीकरणाचे काम पूर्ण होत आले असून नवीन ११० टन क्षमतेचा बॉयलर, ०८ मेगा वॅटचे टर्बाईन व चार मिलचे काम पूर्णत्वाकडे जात आहे.पुढील वर्षी संपूर्ण कारखान्याचे आधूनिकिकरणाचे काम पूर्ण होवून पुढील हंगाम हा नव्या कारखान्यात होवून सर्वच प्रकारच्या खर्चातही मोठी बचत होणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.

                   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्ष बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ साध्या पद्धतीने व मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला होता. मात्र यावर्षी कोरोना संकटाची तीव्रता बऱ्याच अंशी कमी झाल्यामुळे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन दिलीपराव  बोरनारे, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी एस. डी. शिरसाठ तसेच सर्व सलग्न संस्थानचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अरुण चंद्रे यांनी केले तर संचालक वसंतराव आभाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

फोटो ओळ – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ६८ गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ प्रसंगी मा.आ. अशोकराव काळे.आ. आशुतोष काळे, व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे, सौ.अलका बोरनारे व संचालक मंडळ आदी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here