जालना लाठीचार्ज घटनेतील पोलिसांवर निलंबनाची कारवाई करा : नरेंद्र पाटील

0

विटा : जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करा, अशी मागणी माथाडी कामगारांचे नेते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली आहे.
विट्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनांची माहिती तसेच उद्योग मंथन शिबीरात प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र पाटील बोलत होते.

ते म्हणाले, आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी पहिली मागणी १९८२ साली माझे वडील अण्णासाहेब पाटील यांनी केली. आर्थिक निकषावर आरक्षण मिळण्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत संघर्ष केला. तेंव्हापासूनचा आपला हा लढा आहे. आम्ही काय मागतोय? मराठा समाजाला न्याय मिळावा, त्याची आर्थिक उन्नती व्हावी, इतकीच आमची मागणी आहे. यावर केवळ मराठा समाजासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी या आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली.

तिकडे जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. वास्तविक मनोज जारांगे हा युवक गेल्या चार – पाच वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी प्रामाणिकपणे लढत आहे. मी त्याला चांगला ओळखतो, चुकीच्या पद्धतीने तो काहीही करणार नाही. सरकारने आरक्षण द्यावे यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनही करत आहे. या लाठीचार्जच्या घटनेचा निषेध असून या घटनेची सखोल चौकशी करावी व तात्काळ संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here