मेढा : शिवरक्षक वीर जिवाजी महालेंचे स्मारक प्रतापगडावर व्हावे, जिवाजी महालेंची जयंती शासनदरबारी साजरी व्हावी आणि प्रतागडाच्या पायथ्याशी नाभिक समाज्याने खरेदी केलेल्या दहा एकर जागेवर जीवसृष्टी उभारावी अन्यथा लवकरच सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडोंच्या संख्येने मशाल मोर्चा काढणार असे प्रतिपादन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ यांनी केले.
मेढा येथे वीर जिवाजी महालेंची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र निकम, माजी उपाध्यक्ष आर. बी. निकम, खजिनदार संजय गायकवाड, शहरप्रमुख सुर्यकांत निकम, दिपक घाटगे, दिनकर पवार, बाळासाहेब शिर्के, उपाध्यक्ष स्वप्नील शिर्के उपस्थित होते.
विजय सपकाळ म्हणाले, शिवप्रताप दिनाच्या इतिहास अमर असून शिवछत्रपतींचे निष्ठावंत शिवरक्षक विर जिवाजी महालेंचे स्मारक गेली अनेक वर्षे लाल फितीत का अडकवून ठेवले आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून तमाम नाभिक समाज, शिवप्रेमी, जिवाजी प्रेमी यांच्या भावनांचा आदरपुर्वक विचार करून प्रतापगडावर स्मारकाबाबत तातडीने बैठक लावून प्रशासनाची नेमकी भूमिका आणि स्मारकाबाबत कार्यवाही काय सुरु आहे याबाबत माहीती द्यावी. हा लाखो शिवप्रेमींची मागणी आहे. याबाबत जर ठोस कार्यवाही झाली नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडोंच्या संख्येने मशाल मोर्चा काढणार आहोत. तसेच उपोषण व विविध आंदोलने जोपर्यंत जिवाजी महालेच्या स्मारकाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत काढत राहणार असेही स्पष्ट केले. त्याचबरोबर पारंपारीक सलुन व्यवसाय करणाऱ्या नाभिक समाज्याचे कोरोनाकाळात मोठे नुकसान झाले असून आजही सलून व्यवसायात मंदी आहे. हा सेवा उद्योग असून सलुन व्यवसायिक हा स्वच्छता सेवक आहे. हा व्यवसाय टिकण्यासाठी आणि वाढीसाठी शासनाने सलुन व्यवसायासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे अशी मागणीही करण्यात आली.
प्रारंभी वीर जिवाजी महालेंच्या प्रतिमेचे पूजन जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ यांची सावली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबदल संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र निकम यांनी स्वागत केले. खजिनदार संजय गायकवाड यांनी आभार मानले. गणेश सपकाळ, दिलीप सपकाळ, शंकरराव पवार, भरत सपकाळ, सागर सपकाळ, सचिन गायकवाड, विठुल जाधव, बाबु शिर्के, अमोल शिर्के, अनिरूध्द पवार, अभिजीत शिंदे अशोक म्हातेकर, अकुंश कदम, भोलू निकम आदी उपस्थित होते.
जिवाजी महालेंची जयंतीचा विषय तातडीने मार्गी लावा
ज्या भूमीत शिवप्रताप झाला. तो प्रतापगड ज्या जावळी खोऱ्यात आहे. त्याच जावळी खोऱ्यातील आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांनी विशेष लक्ष देवून प्रतापगडावर जिवाजी महालेंचे स्मारक उभारावे अशी मागणी तमाम नाभिक समाज व शिवप्रेमी व जिवाजी प्रेमींनी केली. तसेच शासन दरबारी जिवाजी महालेंची जयंतीचा विषय तातडीने मार्गी लावावा असे स्पष्ट केले.