ड्रोनचा संरक्षीत शेतीसाठी वापर या विषयावर एक आठवड्याचा प्रशिक्षण वर्ग सुरु
राहुरी विद्यापीठ, दि. 11 ऑक्टोबर, 2022
या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात ड्रोनच्या वापराला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले
आहे. शेतीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन
शेतीच्या निविष्ठांवर होणार्या खर्चात व वेळेमध्ये बचत होणार आहे. ड्रोन तंत्रज्ञानामध्ये कृत्रिम
बुध्दीमत्ताचा उपयोग करुन शेतीमध्ये उत्पादनाचे व उत्पन्नाचे नवे मापदंडे प्रस्तापीत होऊ
शकतात. ड्रोन तंत्रज्ञानाने डिजिटल शेतीमध्ये नवे आयाम प्रस्तापीत होतील असे प्रतिपादन नवी
दिल्लीच्या भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (शिक्षण) आणि राष्ट्रीय कृषि उच्च
शिक्षण प्रकल्पाचे राष्ट्रीय संचालक डॉ. आर.सी. अग्रवाल यांनी केले.
कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवी दिल्ली येथील भारतीय कृषि
अनुसंधान परिषदेचा राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
येथील हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र
यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रोनचा संरक्षीत शेतीसाठी वापर या विषयावर एक आठवड्याचे प्रशिक्षण
आयोजीत करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन करतांना भा.कृ.अ.प.चे उपमहासंचालक
(शिक्षण) आणि रा.कृ.उ.शि.प्र.चे राष्ट्रीय निदेशक डॉ. आर.सी. अग्रवाल ऑनलाईन बोलत होते.
याप्रसंगी कास्ट प्रकल्पाचे आणि भा.कृ.अ.प.-रा.कृ.उ.शि.प्र.चे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अनुराधा
अग्रवाल ऑनलाईन उपस्थित होत्या. त्याचबरोबर विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कृषि
अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कास्ट प्रकल्पाचे प्रमुख
संशोधक आणि कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुनिल गोरंटीवार, कास्ट प्रकल्पाचे सह
समन्वयक डॉ. मुकुंद शिंदे उपस्थित होते.
यावेळी डॉ. अनुराधा अग्रवाल म्हणाल्या शेतीमध्ये कृत्रिम बुध्दीमत्ता आणि ड्रोन
तंत्रज्ञानाचा वापर ही आता काळाची गरज आहे. ड्रोन तंत्रज्ञानाचा शेतीत वापर केल्याने शेतीमध्ये
होणार्या खर्चाची बचत होऊन उत्पन्न दुप्पट करण्यास मदत होईल. अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ
मार्गदर्शन करतांना म्हणाले कास्ट प्रकल्पाद्वारे अद्ययावत ड्रोन प्रयोगशाळा विद्यापीठात स्थापन
करण्यात आली आहे. या ड्रोन प्रयोगशाळेमध्ये विविध प्रकारचे 37 ड्रोन उपलब्ध आहे. या
व्यतिरिक्त सहा प्रकारचे औषध फवारणीचे ड्रोन उपलब्ध आहेत. देशात प्रथमच ड्रोन पायलट
प्रशिक्षण संस्था या कृषि विद्यापीठास मंजुर झाली आहे. या एक आठवड्याच्या प्रशिक्षणामध्ये
प्रशिक्षणार्थींना ड्रोनचे पायाभुत ज्ञान आणि ड्रोनचा शेतीमध्ये वापर यावर प्रशिक्षीत केले जाणार
आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कास्ट प्रकल्पाचे प्रमुख डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले.
कार्यक्रमाचे स्वागत या प्रशिक्षणाचे प्रमुख डॉ. सचिन नलावडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार या
प्रशिक्षणाचे सहसमन्वयक डॉ. मुकुंद शिंदे यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. शुभांगी घाडगे यांनी
केले. याप्रसंगी विविध विभागांचे विभाग प्रमुख, या प्रशिक्षण वर्गाचे सहसंचालक डॉ. एम.आर.
पाटील, डॉ. सुनिल कदम आणि देशातील विविध राज्यातून 26 प्रशिक्षणार्थी, प्राध्यापक व
विद्यार्थी उपस्थित होते. हे प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. गीरीषकुमार भणगे, डॉ. वैभव
माळुंजकर, इंजि. निलकंठ मोरे, इंजि. मोहसीन तांबोळी यांनी सहकार्य केले.