तूरडाळ किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त

0

सांगली : मोठ्या प्रमाणात उत्पादनाच्या शक्यतेने सांगलीतील ठोक बाजारात तूरडाळीचे दर किलोमागे ५० रुपयांनी उतरले आहेत. तूरडाळीचे दर कमी होऊ लागताच मूग, मसूर व हरभरा डाळीचे दरही उतरले आहेत.
नवीन हंगामातील तुरीची आवक अद्याप सुरू झालेली नसली तरी सरासरी दर क्विंटलला ७ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली उतरले आहेत.

मंगळवारी सांगलीच्या बाजारात तूरडाळीचा दर क्विंटलला १३ हजार ५०० रुपये होता. पंधरा दिवसांपूर्वी याच तूरडाळीचा दर क्विंटलला १७ हजार ५०० रुपये होता. किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर किलोला १९० रुपयांपर्यंत पोहोचले होते. ते आता १५० रुपयांपर्यंत उतरले आहेत. तर ऐन दसरा-दिवाळीमध्ये हरभरा डाळीचे दर ११० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. अद्याप नवीन हंगामातील हरभरा बाजारात येण्यापूर्वीच हरभरा डाळीचे दर २० रुपयांनी खाली आले आहेत. मसूर डाळीचे दर किलोला ९० रुपये स्थिर असले तरी मूगडाळीचे दर मात्र किलोला १० ते १५ रुपये उतरले आहेत. नवीन हंगामातील तुरीची अद्याप बाजारात आवक झालेली नाही. तरीही किरकोळ आवक असलेल्या तुरीचा दर किमान ७००० ते ८००० रुपये असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

लातूर बाजारपेठेतही घट

लातूर: लातूर बाजारपेठेतही तूरडाळीच्या दरात पन्नास रुपयांची घट झाली आहे. किरकोळ बाजारपेठेत १७५ रुपये किलोपर्यंत तूरडाळीचे भाव होते ते आता घसरून १२५ रुपये किलोपर्यंत आले आहेत. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या प्रांतात तुरीचे विक्रमी पीक आले आहे. देशांतर्गत तुरीची मागणी ४२ लाख टनांची आहे. यंदा तेवढे उत्पादन देशांतर्गतच होण्याची शक्यता आहे. शिवाय बाहेरील देशांतून सुमारे दहा लाख टन तूर आयातीचे करार झालेले आहेत. यामुळे तुरीचा साठा हा मागणीपेक्षा जास्तीचा होणार आहे.

अन्य डाळीही स्वस्त

यंदा पावसामुळे तुरीसोबतच अन्य डाळींचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने त्यांचे दरही घसरले आहेत. डिसेंबरपर्यंत ११० रुपये किलो असलेली हरभरा डाळ २० रुपयांनी तर मूगडाळ १५ रुपयांनी स्वस्त झाली आहे. मसूर डाळीचे दर किलोला ९० रुपयांवर स्थिर असले तरी तिचेही दर काही अंशी कमी होण्याची शक्यता आहे.

नवीन हंगामातील तूर बाजारात आल्यानंतर दरात मोठी घसरण होण्याची शक्यता गृहीत धरून व्यापाऱ्यांनी शिल्लक साठ्यातील तूरडाळ विक्रीस काढल्याने दर कोसळले आहेत. नवीन उत्पादन बाजारात आल्यावर तूरडाळीचा दर शंभरपर्यंत खाली येऊ शकतो. – विवेक शेटे, धान्य व्यापारी, सांगली 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here