सोल : दक्षिण कोरियाची राजधानी सोल इथे हॅलोवीनचा सण साजरा करत असताना असंख्य लोकांना कार्डिअक अरेस्टचा त्रास झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
राष्ट्राध्यक्ष यून सूक योल यांनी आपात्कालीन विभागाच्या चमूला घटनास्थळी पाचारण केलं आहे. इतावून या योंगसन ग्यू जिल्ह्यात हे ठिकाण आहे.
81 लोकांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याची नोंद झाल्याचं अग्निशमन विभागाने सांगितलं आहे.
कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच नो मास्क हॅलोवीन साजरा करण्यासाठी या परिसरात लाखभर लोक जमले होते.
व्हीडिओ फुटेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे प्रचंड गर्दी असलेल्या वातावरणात रस्त्यावरच कार्डिअक अरेस्टचा त्रास झालेल्यांवर आपात्कालीन विभागाचे कर्मचारी उपचार करत असल्याचं दिसत आहे.
सोल शहरातले रस्ते हॅलोवीन साजरा करणाऱ्या नागरिकांनी फुलले होते.
सोशल मीडियावरील काही लोकांच्या पोस्ट पाहिल्या तर त्यांनी इतावून इथे प्रचंड गर्दी झाल्याचं म्हटलं होतं. हा परिसर सुरक्षित नाही, असंही काहींनी म्हटलं होतं. मात्र, इतक्या लोकांना एकाचवेळी कार्डिअक अरेस्टचा त्रास का झाला, याचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
या प्रकारात किती लोकांचा मृत्यू झाला आहे आणि किती लोक जखमी झाले आहेत हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
सोशल मीडियावर दिसणाऱ्या फोटोत रस्त्यावर मृतदेह असल्याचं दिसत आहे.
आपात्कालीन विभागाचे कर्मचारी आणि अन्य नागरिक रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडलेल्या नागरिकांवर उपचार करत असल्याचं दिसत आहेत. योंगसान जिल्ह्यातील प्रत्येकाला मोबाईलमध्ये इमर्जन्सी असा संदेश पाठवण्यात आला आहे. लवकरात लवकर घरी परता असा संदेश देण्यात आला आहे.