दुसऱ्या मातंगऋषी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पद्मश्री गिरीश प्रभुणे

0


पिंपरी (दिनांक : १० डिसेंबर २०२३): मातंग साहित्य परिषद आयोजित दुसऱ्या मातंगऋषी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक – अध्यक्ष प्रा. डॉ. धनंजय भिसे यांनी क्रांतितीर्थ, चापेकर वाडा, चिंचवडगाव येथे शुक्रवार, दिनांक ०८ डिसेंबर २०२३ रोजी दिली.

फेब्रुवारी २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात काळेवाडी, पिंपरी येथील राजवाडा लॉन्स येथे नियोजित असलेल्या या साहित्य संमेलनासाठी अध्यक्षपदाची निवड मातंग साहित्य परिषदेचे मुख्य समन्वयक डॉ. अंबादास सकट यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. सुनील भंडगे, सामाजिक कार्यकर्ते संदीपान झोंबाडे, नरेंद्र पेंडसे, ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी, समरसता साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद दोडे, सुहास घुमरे, जयश्री श्रीखंडे, शाहीर आसराम कसबे, नाना कांबळे, गणेश कळवळे, गुलाब शेंडगे, राजेश रासगे, प्रल्हाद कांबळे, ज्ञानेश्वर कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा. डॉ. धनंजय भिसे यांनी गिरीश प्रभुणे यांना सन्मानपूर्वक निवडपत्र सुपुर्द केले.
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीची स्थापना करण्यात गिरीश प्रभुणे यांचा सिंहाचा वाटा आहे. काही काळ ‘असिधारा’ हे नियतकालिक चालवून त्यांनी पत्रकारिता केली आहे. पिंपरी – चिंचवड शहरात महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा प्रभुणे यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आली असून त्या माध्यमातून त्यांनी शहरात पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले होते. विद्यार्थिदशेपासून लेखनाचा प्रारंभ करून गिरीश प्रभुणे यांनी ‘पालावरचं जिणं’ , ‘पारधी’ , ‘परिसांचा संग’ अशा विविध साहित्यकृतींचे लेखन केले आहे. त्याचबरोबर भटक्याविमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी यमगरवाडी प्रकल्प, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् अशा संस्थांची उभारणी केली आहे. गिरीश प्रभुणे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री सन्मानाने गौरविण्यात आले आहे. मातंगऋषी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या साहित्यिकाची निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

पहिले मातंगऋषी साहित्य संमेलन हे विवेकवादी विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्वागताध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल यांच्या उपस्थितीत संपन्न झाले होते. महाराष्ट्रातून अनेक साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी या संमेलनात सहभाग घेतला होता. यावर्षी पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या निवडीने सर्व समाजात, साहित्य क्षेत्रात एक आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे यावर्षी मोठ्या उत्साहात आणि लोकांच्या प्रचंड पाठिंब्यात हे साहित्य संमेलन संपन्न होईल.

  • प्रदीप गांधलीकर
    ९४२१३०८२०१
    ७४९८१८९६८२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here