देशातील क्रोनी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणे हे आपले कर्तव्य कॉम्रेड – किशोर जाधव

0

 येवला  प्रतिनिधी 

आपल्या देशात क्रोनी अर्थव्यवस्था हळूहळू लादण्याचा प्रयत्न सत्ताधारी मनुवादी शासनाचे प्रतिनिधी करत आहेत. असे प्रतिपादन प्रमुख वक्ता म्हणून विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे माजी अध्यक्ष कॉम्रेड किशोर जाधव यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र वाघ होते.

     येवला येथील महात्मा फुले नगर मधील सत्यशोधक निवास या ठिकाणी बलिप्रतिपदेच्या निमित्ताने बळीराजा गौरव दिन साजरा करण्यात आला. या वेळी शहरातील  कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे विभागीय अध्यक्ष नानासाहेब पटाईत, कॉम्रेड भगवान चित्ते, संजय जाधव आदींनी आपलं मनोगत व्यक्त केले. प्रबुद्ध महाकवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या गीतामध्ये म्हटले होते की “टाटा बिर्ला तरतील बाकी सारेच उपाशी मरतील” या न्यायाने येथील काही दलित उपेक्षित वर्गातील राजकारणी हे प्रस्थापित राजकारण्यांच्या नादी लागून आपल्या देशातील लोकशाहीची चौकट उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत व स्वतःचे उखळ पांढरे करत आहेत. त्याच बरोबर  देशात प्रचंड  बेरोजगारी वाढत आहे. याला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार आहे.  येथील शेतकरी कामगार वर्गाचे दररोज मरण होत आहे. या विरुद्ध जन आंदोलन उभे करण्यात येणार असेही विचार या विचारपीठावरून व्यक्त करण्यात आले.

 सदर कार्यक्रमाचे उद्घाटन इंदुबाई पगारे यांनी महात्मा फुल्यांच्या शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाच्या प्रतिमेचे आणि बळीराजाच्या प्रतिमेचे पूजनाने केले. या प्रसंगी त्यांनी बळीराजा बाबतच्या जुन्या म्हणीची आठवण करून दिली. “इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो, गाई म्हशींनी वाडे भरो, दुधातुपांनी डेरे भरो” असे विधान करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या कार्यक्रमात खंडू खैरनार व राहुल खैरनार यांनी हलगीवादन केले. या कार्यक्रमास संपूर्ण येवला शहरातील पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने राजेंद्र पोळ, बळीराम लोखंडे, रमेश खैरनार, अरुण खैरनार, संकेत जाधव, वैशाली खैरणार, सुनिता जाधव, रोहिणी चित्ते, सुंदर जाधव, नानासाहेब शिंदे, अशोक पगारे, कु. ऋतुजा शिंदे, नितीन गायकवाड, छायाताई खंडागळे, विठाबाई सोनवणे संदीप खरात, संगीता आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.

   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियंता आनंद चित्ते व सूत्रसंचालन संजय जाधव सर तर आभार प्रदर्शन शुभांगी जाधव यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here