ना.अजितदादा पवारांनी केले बर्डे कुटुंबियांचे सांत्वन

0

आदिवासी विकास मंत्र्यांना फोन करून बाधित कुटुंबाला घरकुल देण्याची केली मागणी

संगमनेर : तालुक्यातील खंदळमाळवाडी नजीक असणाऱ्या येठेवाडी जवळील वांदरकडा येथील बर्डे कुटुंबातील चार चिमुरड्यां भावंडांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर अकोले दौऱ्यावर असणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना.अजित पवार यांनी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी संगमनेरच्या पठार भागात असणाऱ्या मृत बालकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच या कुटुंबाला घरकुल मिळण्यासाठी थेट राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत या कुटुंबाला दोन घरकुले देऊन आधार देण्याची विनंती केली. तसेच अधिकाऱ्यांना या कुटुंबाला तात्काळ मदत करण्याच्या सूचना केल्या. 

           शनिवार दि.८ ऑक्टोबर रोजी दुपारी तालुक्याच्या पठार भागातील खंदळमाळवाडी गावांतर्गत असणाऱ्या येठेवाडी परिसरातील वांदरकडा येथे वीज वाहक तारेचा जोरदार धक्का बसून दर्शन अजित बर्डे (वय ८), विराज अजित बर्डे (वय ६ ), अनिकेत अरुण बर्डे (वय १२) आणि ओंकार अरुण बर्डे (वय १०) या चार चिमूरड्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतात दोन सख्ख्या भावांच्या चार मुलांचा समावेश असल्याने संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वांदरकडा येथे जात मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी अकरा लाखाची मदत जाहीर केली होती. त्यानंतर माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात आणि आ.डॉ सुधीर तांबे यांनीही बर्डे कुटुंबीयांची भेट घेत मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान काल सोमवारी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. अजितदादा पवार हे अकोले तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांना  या घटनेसंबंधी समजल्यावर त्यांनी तात्काळ संगमनेरच्या पठार भागातील येठेवाडी येथील मृत मुलांच्या माता पित्याची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी या कुटुंबाला घरकुल नसल्याची बाब त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यावर या कुटुंबांना शबरी घरकुल योजनेतून घरकुल मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी सांगितले. त्यावर ना.अजितदादा पवार यांनी थेट राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना फोन करत या कुटुंबाला तात्काळ घरकुल मंजूर करण्याची विनंती केली. यावेळी बर्डे कुटुंबाने घटनेला नऊ दिवस उलटूनही अद्याप पर्यंत शासकीय मदत मिळाली नसल्याची खंत ना. अजितदादा पवार यांच्यासमोर व्यक्त केली. त्यावर उपस्थित अधिकाऱ्यांना या  कुटुंबाला तात्काळ शासकीय आर्थिक मदत करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.अजितदादा पवार यांनी यावेळी अकलापूर येथील जागृत देवस्थान असलेल्या दत्तात्रय महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी अकोल्याचे आ.डॉ किरण लहामटे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, एन.एस.यु आयचे तालुकाध्यक्ष गौरव डोंगरे, महावितरणचे  उपकार्यकारी अभियंता श्री.पाटील, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, पंचायत समितीचे माजी सदस्य संतोष शेळके, डॉ. दत्तात्रय हांडे, संतोष देवकर, शिवाजी तळेकर, संपत आभाळे, अशोक वाघ, बाळासाहेब ढोले, विकास शेळके, सुहास वाळुंज, बाळासाहेब कुऱ्हाडे, रघुनाथ आभाळे, पांडुरंग कुरकुटे, सुरेश गाडेकर, अमीर शेख, संदीप आभाळे, विशाल वाणी, मुन्ना शेख, बाळासाहेब कुरकुटे, दिनेश पावडे, मुनीर शेख, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, मनसेचे किशोर डोके, बाळासाहेब कुऱ्हाडे, सरपंच अरुण वाघ, विकास शेळके, बाळासाहेब ढोले, संपत आभाळे, योगेश सूर्यवंशी, विकास डमाळे, पांडू शेळके आदी उपस्थित होते.

चौकट :-

 मिळालेली मदत खर्च न करता, मुदत ठेवीत ठेवा. पैसे पतसंस्थेत ठेवू नका. पतसंस्था बुडतात. त्यापेक्षा राष्ट्रीयकृत बँकेत ठेवा किंवा शेतकऱ्यांची बँक असलेल्या नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवा. असा मोलाचा सल्ला माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना.अजितदादा पवार यांनी बर्डे कुटुंबियांना हात जोडून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here