निलेश लंके यांचा दणदणीत विजय ;विखे पाटील यांच्या पन्नास वर्षाच्या सत्तेला लागला सुरुंग

0

राहुरी तालूक्यात विखे- लंके बरोबरीत. तालूक्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते व नेते मंडळींचा एकत्र येऊन जल्लोष.

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी, 

         विखे पाटील यांच्या पन्नास वर्षाच्या सत्तेला निलेश लंके यांनी अखेर सुरंग लावत बाजी मारली. न भूतो न भविष्यती असा निकाल आज लोकसभेचा लागला असून यामध्ये निलेश लंके हे सुमारे एक लाख मताने विजयी झाले आहेत. या विजयाचा राहुरी तालूक्यात महाविकास आघाडीच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला.

          अहमदनगर दक्षिणचे लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया ही १३ मे रोजी संपन्न झाली होती. यामध्ये दक्षिण मतदार संघातून १२ लाख ६३ हजार ७८१ मतदारांनी मतदान केले होते यामध्ये राहुरी तालुक्यात २ लाख १७ हजार ५६५ असे एकूण ७१ टक्के मतदान झाले होते. मतदान घडवून आणण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व पुढार्‍यांनी कंबर कसली होती. यामध्ये दक्षिण मतदार संघात सुमारे ६४ टक्के मतदान झाले होते. राहुरी विधानसभा मतदार संघ हा विखेंचा बालेकिल्ला असल्यामुळे या मतदार संघाच्या मताधिक्याकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते परंतु या ठिकाणी विखे व लंके हे थोड्याफार प्रमाणात बरोबरीत चालले. मात्र कर्जत, जामखेड, पारनेर आदि भागातून लंके यांनी मुसंडी मारली.

           आज दिनांक ४ जून २०२४ रोजी नगर येथे सकाळी मतमोजणी सुरु झाल्या नंतर सुरवातीचे चार ते पाच फेऱ्या अटीतटीत झाल्या. मात्र त्यानंतर प्रत्येक फेरीला निलेश लंके आघाडी घेत गेले. अखेर सुमारे एक लाख मताने निलेश लंके यांचा विजय झाला. राहुरी शहरात आमदार तनपूरे यांचे संपर्क कार्यालय, शनी चौक व बाजार समीती समोर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व नेते मंडळींनी एकत्र येऊन गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात शहरातून मिरवणूक काढण्यात आली. निलेश लंके यांनी अखेर विखे यांच्या ५० वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावून दणदणीत विजय मिळवला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here