कराड : लोकसभा निवडणुकीसाठी सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरेना असे चित्र आहे. त्यामुळे उमेदवार कोण असणार? याबाबत उत्सुकता आहे. मात्र, निवडणुकीची थेट रणधुमाळी सुरू होण्याअगोदरच कराड उत्तर मतदारसंघात आरफळ कालव्यात आलेल्या पाण्यावरून भाजपचे नेते आणि शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरू आहे.
कालव्याला आलेल्या तारळी धरणाचे पाणी अजून शेतकऱ्यांच्या शिवारात पोहचतंय तोच दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आमच्या नेत्यांमुळेच कालव्यात पाणी आल्याचा दावा केला जात आहे. त्या कालव्याच्या पाण्याचा लाभ झालेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून मात्र, पाणी कोणी आणले, यापेक्षा कडक उन्हाळ्यात शेती पिकाला पाणी मिळून ती पिके तरारतील, या आशेने समाधान व्यक्त करत आहेत.
आरफळ कालव्याला तारळी धरणातून पाणी सोडण्याची कार्यवाही सुमारे 2013-14 मध्ये सुरू झाली. त्यानंतर अनेक कारणांनी ते काम पूर्णच झाले नाही. त्यानंतर आरफळ कालव्यामध्ये कण्हेर प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शेती पाण्याचा दिलासा मिळाला. त्यादरम्यानच्या काळात तारळीच्या पाणी सोडण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही.
मात्र, अलीकडे उन्हाळ्याची तीव्रता वाढून पिके जळू लागली. त्यामुळे कण्हेर प्रकल्पाचे पाणी माण- खटावला सोडण्यात आले. परिणामी या भागातील पिकांचे नुकसान होऊ लागले. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या शेती पाण्यासाठी तारळी धरणातून पाणी सोडण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यानुसार तारळी धरणाचे पाणी सोडले.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. त्यातच सातारा लोकसभा मतदारसंघाचा भाजप आणि राष्ट्रवादीचा उमेदवार अद्यापही जाहीर नाही. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार? याबाबत सर्वसामान्यांत अनेक नावांची चर्चा आहे. त्यासाठी संबंधित पक्षांच्या हायकमांडनीही मतदारसंघातील नेत्यांचा कानोसा घेतला आहे. मात्र, उमेदवारांची नावे जाहीर न केल्याने सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे साताऱ्याचा तिढा सुटणार कधी? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
याच धामधुमीत सध्या कराड उत्तर मतदारसंघात आरफळ कालव्यात आलेल्या तारळी धरणाच्या पाण्यावरून श्रेयवाद सुरू आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या (शरद पवार) पदाधिकाऱ्यांनी आमच्याच नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे कालव्यामध्ये पाणी आल्याचा दावा केला आहे. या कालव्यात आलेल्या पाण्याचे पूजन भाजपचे नेते मनोज घोरपडे व अन्य पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्याच्या उपस्थितीत केले. त्या वेळी आमच्या पक्षाच्या नेत्यांमुळेच पाणी आरफळ कालव्यात आल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले.
तर राष्ट्रवादीचे (शरद पवार) मानसिंगराव जगदाळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनीही पाण्याचे पूजन केले. त्या वेळी त्यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्यामुळेच कालव्याला पाणी आल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाणी आम्हीच आणल्याचा दावा केल्याने सर्वसमान्य मात्र संभ्रमात पडले आहेत. मात्र, पाणी कोणीही आणू द्या, पाणी आमच्या पिकाला मिळाल्याने त्यांना जीवदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी मात्र समाधान व्यक्त केले आहे.
कडक उन्हाळ्यामुळे पिके जगणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने आरफळ कालव्यामध्ये पाणी सोडावे, अशी मागणी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सचिन नलवडे यांनी करून आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर लवकरच तारळी धरणाचे पाणी कालव्यात सोडण्यात आले. त्यामुळे आता रयत क्रांती संघटनेनेही आमच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळेच पाणी सोडण्यात आल्याचा दावा केला आहे.
पाणी नेमके कोणामुळे? –
तारळी धरणाचे पाणी आरफळ कालव्यात आल्यामुळे मसूरच्या पूर्व भागातील अनेक गावांतील शेती पिकांना जीवदान मिळणार आहे. दरम्यान, या पाण्याचा कऱ्हाड उत्तरमधील पदाधिकाऱ्यांकडून जोरदार श्रेयवाद सुरू आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पाणी आमच्याच नेत्यांच्या प्रयत्नामुळे आल्याचा दावा केला आहे. त्यातच आता रयत क्रांती शेतकरी संघटनेनेही आरफळ कालव्याला पाणी सोडण्यासाठी आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यामुळेच पाणी आल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पाणी नेमके कोणामुळे आले याबाबतची सोयीनुसार चर्चा सुर