नीट परीक्षा घोटाळ्याचे माढा कनेक्शन; अटकेतील शिक्षक सोलापूरचा

0

सोलापूर : नीट परीक्षा घोटाळ्यातील धागेदोरे फक्त दिल्ली, यूपीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. तर हे धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचले आहेत. या घोटाळ्याप्रकरणी लातूरमधील एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
हा शिक्षक लातूरमध्ये शिकवत असला तरी तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे माढातही त्याचं जाळं किती पसरलंय याचा तपास करण्यात येणार आहे. आपल्या गावचा शिक्षकही नीट घोटाळ्यातील आरोपी निघाल्याने माढात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

नीट परीक्षा घोटाळ्यात माढा कनेक्शन समोर आलं आहे. नीट परीक्षा घोटाळ्याच्या प्रकरणात अटक केलेला संजय तुकाराम जाधव हा शिक्षक माढा तालुक्यीतील टाकळी गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. शाळा सुरू झाल्यापासून तो शाळेकडे फिरकलेला देखील नव्हता. टाकळीच्या शाळेवर पोटशिक्षकाची नियुक्ती करुन संजय जाधव लातूरमध्ये क्लासेस घेत होता, अशी माहिती समोर आली आहे.

सखोल चौकशी करा

उपशिक्षकाचे नाव नीट परीक्षा कनेक्शनमध्ये आल्याने सोलापूर जिल्हाच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. संजय जाधवचे आणखी कोण साथीदार माढ्यात आहेत का? याचा तपास करण्याची गरज आहे. संजय जाधवच्या पाठिमागे कोण राजकीय व्यक्ती अथवा अधिकारी आहेत का? याच्या सखोल चौकशीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सहा जणांचा समावेश

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात लातूर पोलिसांचा वेगाने तपास सुरू आहे, जलील पठाण आणि संजय जाधव या दोन शिक्षकांसह चार जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आणखी दोन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात जलील पठाण हा अटकेत आहे, त्याला 2 जुलैपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तर संजय जाधव हा पोलिसांच्या ताब्यात आहे. धाराशिवमध्ये आयटीआय सुपरवायझर असलेला इरना कोनगलवार आणि दिल्लीचा गंगाधर मुंडे या दोघांचा शोध सुरू आहे. तर आणखी दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. म्हणजे नीट गैरव्यवहार प्रकरणात आता पर्यंत सहा जणांचा संबंध जोडला गेला आहे.

5 लाखासाठी पेपर लिक

जलील पठाण आणि संजय जाधव यांच्याकडून पोलिसांनी मोबाईल सेटसह काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. प्राथमिक माहिती नुसार, त्यात 5 लाख रुपयांच्या मोबदल्यात नीटचा पेपर लिक करण्यात येत होता आणि त्यासाठी 50 हजार रुपये अॅडव्हान्स म्हणून घेतले जात असल्याची माहिती आहे. लातूर पोलिसांनी या प्रकरणात कमालीची गोपनीयता बाळगली असून वेगाने तपास सुरू आहे. लवकरच पोलिसांच्या ताब्यात असलेल्या जलील पठाण आणि संजय जाधव या दोन शिक्षकांना गंगाधर मुंडे यांच्या शोधासाठी दिल्लीला घेऊन जातील अशी शक्यता आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here