उरण दि ८(विठ्ठल ममताबादे )८ ऑगस्ट २०१८ रोजी सी.एच.ए(कस्टम हाऊस एजन्ट )बांधवांच्या हितासाठी स्थापन झालेल्या न्हावा शेवा सी.एच.ए संघटनेच्या वतीने आजवर अपघाती निधन झालेल्या आणि अपघातात जखमी झालेल्या सी.एच.ए बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबियांना साडे आठ लाखाहून अधिक निधीचे वाटप झाले आहे, नवीन संकल्पना म्हणून सी.एच.ए बांधवांच्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना देखील प्रति कुटुंब १० हजार अश्या मदतीच्या माध्यमातून आजवर ४०,००० मदत निधीचे वाटप झाले आहे.
सध्या न्हावा शेवा सी.एच.ए. संघटना नोंदणीकृत न्हावा शेवा सी.एच.ए.आधार सामाजिक संस्था म्हणून कार्यरत आहे, समाजातून सर्व वर्गातून या संघटनेचे कौतुक होत असून या संघटनेच्या आधार चषकाच्या माध्यमातून आधार निधी संकलनासाठी समाजाच्या सर्व स्तरातून सर्वोतोपरी सहकार्य होत आहे या अनुषंगाने आपणही सामाजिक बांधिलकीची जोपासना करावी या उद्देशाने दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी श्री दत्त मंदिर पाणदिवे येथे समर्पण ब्लड सेंटर कोप्रोली च्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात २० हुन अधिक महिलांसकट एकूण ११६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उदघाटन केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक रायगड भूषण राजू मुंबईकर आणि वेश्वि ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेंद्र मुंबईकर यांच्या हस्ते तसेच आगरी, कोळी कराडी सामाजिक संस्थेचे उरण तालुका सचिव अनिल घरत,आदर्श शिक्षक दिपक पाटील, सामाजिक कार्यकर्ते अमित पाटील,प्रसिद्ध क्रिकेटपट्टू योगेश म्हात्रे कवियत्री हेमाली म्हात्रे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
याआधी न्हावा शेवा सी.एच.ए. संघटना म्हणून कार्यरत असलेल्या आणि सध्या नोंदणीकृत न्हावा शेवा सी.एच.ए. आधार सामाजिक संस्था म्हणून नामांतर झालेल्या संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबिरासारखा सामाजिक उपक्रम हाती घेऊन सामाजिक क्षेत्रात पाऊल टाकले आहे.
दिवसभरात माजी जि. प.सदस्य तथा उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, उरण तालुका महिला भाजप अध्यक्षा राणिताई म्हात्रे, चिटणीस निशाताई म्हात्रे, पूर्व विभाग भाजप अध्यक्ष शशिभाई पाटील , गोवठणे महिला भाजप अध्यक्षा विश्रांती म्हात्रे, सारडे गावचे सरपंच रोशन पाटील, वशेणी गावचे माजी सरपंच प्रसाद पाटील,छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश म्हात्रे, पत्रकार विठ्ठल ममताबादे, पत्रकार कैलास पाटील, सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर, नंदकुमार पाटील,यु ट्यूब स्टार आणि नाट्यकलाकार रोशन घरत, सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी या शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी आणि सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली, निवेदन सुप्रसिद्ध निवेदक गोवठणे विकास मंच चे अध्यक्ष सुनिल वर्तक यांनी केले, तर त्यांना संस्थेचे खजिनदार मिलिंद म्हात्रे यांनी साथ दिली. संस्थेचे अध्यक्ष रुपेश पाटील यांनी सर्व रक्तदात्यांचे आणि सहकारी वर्गाचे आभार मानले.