सोलापूर : वाशिम जिल्ह्यात वन्य प्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त असल्याची माहिती मिळाली आहे. हरीण, नीलगाय, रान डुक्करांचे कळप पावसामुळे चांगली झालेली रोपं आता उद्धवस्त करीत आहेत.
पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. वन विभागाकडे तक्रार देऊनही दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त करा अन्यथा पालकमंत्र्यांना स्वातंत्र्य दिनी झेंडा फडकवू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवक प्रदेश अध्यक्ष दामुअण्णा इंगोले यांनी दिला आहे. पोलिसांनी दामुअण्णा इंगोले यांना 149 अंतर्गत नोटीस दिली असून बेकायदेशीर गोष्टी केल्यास कायदेशीर कारवाई करु असं सांगितलं आहे.
परभणी जिल्ह्यात पाऊस गायब
परभणी जिल्ह्यात मागच्या 12 ते 14 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा खंड पडला आहे. वाढीच्या आणि फुलोरा अवस्थेतील पिकांना पाणी नसल्यामुळे पीक वाळून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाऊस नसल्यामुळं शेतकऱ्यांनी सिंचनावर भर दिला आहे. परभणीच्या पुर्णा तालुक्यात व परिसरात पावसाअभावी पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. या आठवड्यात पाऊस झाला नाही, तर पिकांचे अतोनात नुकसान होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
पाऊसाने दडी मारल्यमुळे शेतकरी चिंतेत
जालना जिल्ह्यात गेल्या एक महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग निराश झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीवेळी खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी व्याजाने काढले असल्याची व्यथा सांगत आहेत. चांगला पाऊस पडेल आणि चांगले पीक येईल अशी शेतकऱ्यांना अजूनही आशा आहे. येत्या दहा दिवसात चांगला पाऊस झाला नाही, तर शेतकऱ्यांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी खूष
सोलापूर जिल्ह्यात कांद्या उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची आहे. कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शेतकरी अधिक खूष आहेत. आठ ते दहा रुपयांवर असलेल्या कांदा आता 25 रुपयांवर पोहोचला आहे. मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटल्याने कांद्याचे दर वाढायला सुरुवात झाली आहे. पावसामुळे कांद्याची आवक घटली आहे, त्यामुळे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये घाऊक बाजारात कांदा 30 ते 40 रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहे.