पैठण : जायकवाडी सह परीसरात दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे वसु बारस शुक्रवार (दिं २१) रोजी वसुबारसेनिमित्त शेतकऱ्यांनी गाय-वासराची पूजा करण्यात आली.
दिवाळीच्या सणाची सुरुवात वसुबारस या दिवसापासून होते. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारतीय संस्कृतीत गायीला अनन्य साधारण महत्त्व आहे. ‘ज्याच्या घरी गाय तिथे विठ्ठलाचे पाय’ असे संतवचन प्रसिद्ध आहे. यातूनच गायीचे महत्त्व अधोरेखित होते.
वसुबारस हा गाय आणि वासराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. ग्रामीण भागात या दिवसाला विशेष महत्त्व असते. वसुबारसेच्या दिवशी महिला जनावरांचा गोठा स्वच्छ धुऊन शेणाने सारवून घेतात. वसुबारसेला गायीला सजविले जाते. गळ्यात फुलांच्या माळा घातल्या जातात. घरातील महिला गायीला ओवाळून पुरणपोळीचा नैवेद्य खायला देतात.
पैठण तालुक्यातील तेलवाडी येथील प्रगतशील शेतकरी विनोदकुमार मुंदडा व सुरज मुंदडा यांनी आपल्या शेतातील गोठ्यात खास करून देशी गायी व बैल यांचे संगोपन केले आहे. त्यांच्या घरी गाय-वासराची पूजा करून वसुबारस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.