पोलीस कर्मचाऱ्यांचे निवासस्थान व ग्रामीण पोलीस स्टेशन इमारतीसाठी निधी द्या

0

आ. आशुतोष काळेंची उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव पोलीस कर्मचाऱ्यांचे निवासस्थानासाठी व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी निधी मिळावा तसेच मतदार संघातील पोलीस स्टेशन सबंधित असणाऱ्या समस्या तातडीने सोडवा अशी मागणी आ. आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

कोपरगाव शहारातील जीर्ण झालेली पोलीस वसाहत, मोडकळीस आलेल्या ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारतीची झालेली दुरावस्था व अनेक गावाचा पोलीस स्टेशन सबंधित असणाऱ्या समस्यांबाबत आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यापुढे पोलीस स्टेशन सबंधित अनेक समस्या मांडून त्याकडे त्यांचे लक्ष वेधले.  कोपरगाव शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांचे निवासस्थानाचे बांधकाम हे खूप जुने असून अतिशय जीर्ण झालेले आहे. हि पोलीस कर्मचारी वसाहत  वास्तव्य करण्यास अयोग्य  व तेवढीच धोकादायक आहे. तरीदेखील अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य बजावून या वसाहतीत वास्तव्य करीत आहे.

या बाबतचा सविस्तर अहवाल पोलीस अधिक्षक, अहमदनगर, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी पोलीस संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच विशेष व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य, पोलीस गृहनिर्माण, वरळी या कार्यालयाकडे निवासस्थान बांधकामाच्या अंदाजपत्रके मान्यतेसाठी व निधी मिळणेकरिता परिपूर्ण प्रस्ताव सादर केलेला आहे. तसेच कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची इमारत देखील अत्यंत जीर्ण झालेली असून मोडकळीस आलेली आहे. सध्या सर्वत्र सुरु असलेले मोठ्या स्वरूपातील पर्जन्यमान पाहता या दोनही ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर इमारतीचे दुरुस्तीचे काम तातडीने करणे अत्यंत आवश्यक आहे. सदरच्या इमारतीच्या दुरुस्तीचा व नूतनीकरणाचा परिपूर्ण प्रस्ताव पोलीस अधिक्षक, अहमदनगर कार्यालयामार्फत पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचेकडे सादर करण्यात आलेला आहे. एकूण परिस्थितीचा गांभिर्याने विचार करून आपण याबाबत तातडीने निर्णय घेवून बांधकाम करण्याच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी व जास्तीत निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी यावेळी केली.

तसेच कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शिर्डी पोलीस ठाणे हद्दीतील पोहेगाव बु., पोहेगाव खु., व जवळके हि ३ गावे मागील काही वर्षापासून शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत समाविष्ट केलेली आहे. या गावातील नागरिकांचे तहसील, पंचायत समिती कार्यालय कोपरगावच्या माध्यमातून शासकीय सर्व प्रकारचे कामकाजाची कार्यवाही होते मात्र पोलीस स्टेशन सबंधित कामासाठी या या तीनही गावातील नागरिकांना राहाता पोलीस स्टेशनशी संपर्क करावा लागतो. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. हि गावे कोपरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत समाविष्ट होणेबाबत या तीनही गावातील ग्रामपंचायतीने ठराव मंजूर केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांनी दिनांक ०३/०२/२०२२ रोजी गावांची हद्द निश्चित करून ठरावांचे समंती पत्र सह सादर केलेला अहवाल पोलीस अधिक्षक कार्यालय, अहमदनगर या कार्यालयामार्फत वरील नमूद संदर्भाधीन पत्रान्वये मा.पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई या कार्यालयास सादर करून शासनाच्या गृह विभागास सादर करण्यात आलेला आहे.याची दखल घ्यावी व हे तीनही गावे कोपरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत समाविष्ट होण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध होणेबाबत तातडीने कार्यवाही करावी. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई यांचेकडे मा.चेअरमन या पदाची नियुक्ती अद्यापपर्यंत झालेली नाही त्यामुळे संदर्भीय रिव्हयू केसची सुनावणी प्रलंबित आहे. रिव्हयूबाबत सुनावणी होऊन अंतिम आदेश तातडीने होणेसाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणावर मा.चेअरमन या पदाची नियुक्ती तातडीने होणेबाबत संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत.अशा अनेक मागण्या आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात केल्या आहेत. त्याबाबत सकारात्मक भूमिका घेवून लवकरच निधी उपलब्ध करून देवू अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. फडणवीस यांनी दिली आहे. 

          फोटो ओळ – कोपरगाव मतदार संघातील पोलीस स्टेशन सबंधित विविध मागण्यांचे निवेदन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. फडणवीस यांना देतांना आ. आशुतोष काळे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here