बळीराजाचे आणि त्याच्या शेती पिकांचे वास्तव सांगणाऱ्या”त्या” व्हिडिओने तरी सरकारला जाग येणार का ? 

0

संगमनेर / चंद्रकांत शिंदे पाटील

सततच्या पावसाने बळीराजा प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात असताना दीपावलीचा सण उद्यावर आला आहे. खरे तर अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा “दीप” मांगल्याचे प्रतीक समजले जाते. त्याच्या प्रकाशाने प्रत्येकाच्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीचा, आनंद उत्सवाचा आणि कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जात असताना बळीराजाच्या जीवनात मात्र सध्याच्या परिस्थितीने खचाखच अंधार भरला आहे. राज्य सरकारकडून अजूनही शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे सरसकट पंचनामे आणि ओल्या दुष्काळाची घोषणा होत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. जगाच्या अन्नदात्याला कोणी वाली आहे की नाही, अशी परिस्थिती असताना सध्या शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या शेती पिकांचे वास्तव सांगणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्या व्हिडिओने तरी सरकारला जाग येणार का ? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

           शेतकऱ्यांचे वास्तव मांडणारा हा व्हिडिओ असा आहे, शिंदे साहेब झाली का दिवाळी ? उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब तुमची झाली का दिवाळी ? ढाल, तलवार, मशाल फोडाफोडीच राजकारण, पैसाच पैसा दिसतोय सरकारकडे! मोक्कार पैशाचं वाटप सुद्धा सुरू आहे. दसऱ्यानिमित्त झालेल्या पैशांचं शक्ती प्रदर्शन, शक्ती प्रदर्शन असो किंवा रोखठोक पैशाच्याच बाता. ज्या आहेत त्या सरकारकडूनच सुरू आहेत. म्हणजे एकंदरीत काय तर दिवाळी आपल्या सरकारची जोरात सुरू आहे. आपलेच सरकारचे म्हणावे लागेल ना. कारण जनतेचे सेवक हे असले तरी मालक तर आपण आहोत ना. आपणच यांना निवडून दिले. चला तुमची दिवाळी झाली असेल तर थोडं आमच्याकडे बघा. शेतकरी नावाचा व्यक्ती कळतो का हो तुम्हाला. उभ्या जगाचा पोशिंदा ना तो.सगळं शेत त्याच पाण्याखाली गेलय. 

कुठे सोयाबीन, कुठे कांदा, कुठे शेंगा दिसतंय का ते. तुमचे महाशय मंत्री म्हणतात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती नाहीये. अहो मंत्री साहेब शेताच्या बांधावर तरी येऊन बघा मग कळेल दुष्काळ म्हणजे काय, ओला दुष्काळ म्हणजे काय. त्या कुटुंबाच्या घरामध्ये सुद्धा लहान लहान लेकर आहेत. त्यांच्याकडे तरी बघा, दिवाळी त्यांचीही असते. भलेही तुमच्यासारखी नसेल पण त्यांची ही दिवाळी आहेच की. राज्यात परतीच्या पावसानं थैमान घातलय, आभाळ फाटल्यागत पाऊस पडतोय आणि पडणाऱ्या पावसात बळीराजा उध्वस्त होतोय. या पावसानं हातची पिक वाया गेली आहेत. सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय. सगळ्यात जास्त फटका मराठवाडा आणि विदर्भाला बसला. इकडे नगर, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातही शेती पिकांचं मोठं नुकसान झाले आणि तुम्ही झोपलात का हो. दिवाळी तोंडावर आलीय. सांगा ना या शेतकऱ्यांसाठी काय केले तुम्ही. सोयाबीनची माती आणि कापसाच्या वाती झाल्यात. भाजीपाला, कांदा, द्राक्ष, केळी यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाण्याखाली असे लोंढे लोंढे गेलेत. सुरुवातीला अतिवृष्टी झाली त्यात काही पिकं वाया गेली. काही ठिकाणी कशीबशी वाचली. पुढे गोगलगायीचे संकट, या संकटातून शेतकरी सावरत असताना उरले सुरलं  पीक परतीच्या पावसानं हिरावून घेतले. हाती काहीच लागणार नसल्याने दिवाळी साजरी करायची कशी ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. शिंदे साहेब, अहो पैशांची मस्ती सरकारमध्ये ही दिसते आणि विरोधकांमध्ये सुद्धा दिसते. सगळे शेतकऱी बागायतदार शेतकरी नाहीयेत.पन्नास पन्नास,साठ साठ  एकरावाले शेतकरी नाहीयेत. काहींचं एक एकर, अर्धा एकर शेती आहे. सांगा ना त्यांनी त्यांच्या पोटाची खळगी कशी भरायची. इतकं सगळं होत असताना राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय. पण माननीय राज्याचे आमचे कृषीमंत्री महोदय अब्दुल सत्तार म्हणताहेत की ओला दुष्काळ जाहीर करावा अशी स्थिती नाहीये. अहो मंत्री साहेब कधी शेताचा बांध तरी तुम्ही चढलात का ? आता सत्तारांना एकच प्रश्न आहे की ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी नेमकं काय होण अपेक्षित आहे. आणखी किती पावसाची गरज आहे. सध्या पिक पाण्यावर तरंगतात. आता माणसं पाण्यावर तरंगण तुम्हाला अपेक्षित आहे का. संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करणे तुम्हाला शक्य होत नसेल तर जिथे अतिवृष्टी झाली तिथे तरी ओला दुष्काळ जाहीर करा. मागच्या तीन चार दिवसात नुकसानग्रस्त भागातील काही शेतकऱ्यांनी टोकाचे पावलं उचललीत. विदर्भात तीन दिवसात तीन आत्महत्या झाल्यात. यामध्ये भंडारा, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्याचा समावेश आहे. दुसरीकडे मराठवाड्यात परभणी मध्ये दोन, नांदेड मध्ये एक आणि बीडमध्ये एक अशा चार शेतकरी आत्महत्या मराठवाड्यात झाल्यात. हे खूप भयानक आहे मंत्री साहेब, याला जबाबदार कोण ? खरंतर आत्महत्या करणे हा पर्याय नक्कीच नाही पण तरी देखील शेतकरी आत्महत्या करतात. त्यामुळे या काळात त्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. एक एक जीव जात असताना राजकारणी मात्र फेकाफेकी आणि फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहेत. परभणी, लातूर, औरंगाबाद मधील काही शेतकऱ्यांशी बोललो. खरंच परिस्थिती विदारक आहे. हाती काहीच लागण्याची शक्यता नाही. जे काही उरलं सुरल ते गुडघाभर पाणी. सध्या पाऊस सुरू आहे. कधी वापसा होणार, कधी पिक हातात  येणार हे काही सांगू शकत नाहीये. राजकारण्यांचं, स्थानिक लोकप्रतिनिधींचे काहीच लक्ष नाही. सगळे दोष मात्र शेतकऱ्यांना देतात. शेतकऱ्यांना पण आई, वडील, बहीण, बायको, लेकरं आहेतच की. याची जाणीव राजकारण्यांना कधी होणार. हा बळीराजा डोळ्यातून पाणी काढून रडतोय आणि म्हणे काय तो उभ्या जगाचा पोशिंदा.हे, शेतकऱ्यांचे सरकार, हे पटतय का ? असा हा व्हिडिओ सांगून जात आहे. सध्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये शेतकऱ्यांच्या वास्तव जीवनाविषयी पाहिजे तसे कव्हरेज मिळत नसल्याने आपली मागणी सरकारपर्यंत जावी. यासाठी अनेक जण सोशल मीडियाचा वापर करून आपले दुःख सरकारच्या नजरेसमोर आणू पाहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here