प्रवीण बागडे:नागपूर प्रतिनिधी : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत असलेल्या मत्स्य विज्ञान महाविद्यालय, नागपूरच्या नविन इमारतीचे उद्घाटन पंकजाताई मुंडे, मंत्री, पशुसंवर्धन, पर्यावरण आणि हवामान बदल, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सोमवार करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमाचे अतिथी डॉ. हिमांशू पाठक, सचिव (कृषि अनुसंधान आणि शिक्षण) तथा महानिदेशक, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली तसेच डॉ. एन. रामास्वामी, सचिव, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य होते.
डॉ. नितीन पाटील, कुलगुरू, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांनी प्रमुख अतिथी मा. ना. पंकजाताई मुंडे आणि इतर मान्यवरांचे महाविद्यालयामध्ये स्वागत केले. मत्स्य विज्ञान महाविद्यालय, नागपूर विदर्भातील मत्स्यव्यवसाय शिक्षण, संशोधन आणि विस्तार क्षेत्रात कार्य करणारी एकमेव संस्था असून महाविद्यालयामार्फत शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसाय व मत्स्य पालन याविषयीचे प्रशिक्षण कार्यक्रमही राबविले जातात असेही यावेळी नमूद करण्यात आले. महाविद्यालयाच्या नविन इमारतीमधील तळमजल्याचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याकरीता रू. 5.50 कोटी इतका खर्च झाल्याचे आणि इमारतीच्या उर्वरीत बांधकामाकरीता रू. 21.40 कोटी इतका निधी शासन स्तरावरून अपेक्षित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पंकजा मुंडे यांनी महाविद्यालयातील मत्स्य अभियांत्रिकी, मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान इत्यादी विभांगांमधील शैक्षणिक आणि विस्तार सुविधांचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे महाविद्यालयाने विकसीत केलेल्या फिरता मत्स्य विक्री संच तसेच माशांचे धुरीकरण संयंत्र या तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेतली. महाविद्यालयाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यांचे बांधकाम, मुलांचे वसतीगृह तसेच मुलींचे वसतीगृह याकरीता निधीबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावे असे निर्देश यावेळी दिले.
सदर उद्घाटनाप्रसंगी डॉ. प्रविण कुमार देवरे, आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, डॉ. राघवेंद्र भट्टा, उपमहानिदेशक, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे डॉ. एस. व्हि. उपाध्ये, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता(पशु विज्ञान शाखा), डॉ. एन. व्हि. कुरकुरे, संचालक संशोधन, डॉ. एस. डब्ल्यु. बोंडे, अधिष्ठाता (मत्स्य विज्ञान विद्या शाखा), श्रीमती मोना ठाकूर, कुलसचिव, श्रीमती मनिषा शेंडे, नियंत्रक आणि श्री. आरीफ शेख, विद्यापीठ अभियंता इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. मत्स्य विज्ञान महाविद्यालय, नागपूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत तेलवेकर आणि महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर अधिकारी/कर्मचारी कार्यक्रमाच्या यशस्वीकरीता परिश्रम घेतले.