मराठी भाषेतील साहित्य म्हणजे वैभवाची खाण : प्रा.डॉ. सविता माळी

0

     

कडेगांव दि.19(प्रतिनिधी) : महानुभावी साहित्यापासून ते संत साहित्य, पंत साहित्य, तंत साहित्य, पंडिती काव्य आणि आधुनिक मराठी साहित्य म्हणजे वैभवाची खाण असून हे वैभव आपण विसरत चाललो आहोत हे आपले दुर्देव्य आहे असे प्रतिपादन कन्या महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. सविता माळी यांनी केले. 

           ते आर्टस् ॲन्ड कॉमर्स कॉलेज, कडेपूर येथे ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ उइघाटन प्रसंगी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.बापूराव पवार होते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जातो. त्याचे उद्घाटन प्रा. डॉ. सविता माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. कुमार इंगळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शीला इंगवले, प्रा. शिवराज उथळे उपस्थित होते. प्रारंभी प्रा.डॉ.नामदेव पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यामागील उद्देश सांगितला.

             ज्ञानेश्वरांची ओवी, तुकारामांचे अभंग, एकनाथांनी भारुडे याबरोबरच संत, पंथ – तंत व पंडिती काव्य हे मराठी भाषेचे वैभव आहे हे वैभव आपण विसरत चाललो आहोत, हे आपले दुर्दैव्य आहे असे सांगून त्या पुढे म्हणाले की, मराठी भाषेचे सामर्थ्य वाढविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. वाचन करून विदयार्थ्यांनी शब्दाच्या माध्यमातून अनुभव व्यक्त केले पाहिजेत असेही त्या शेवटी म्हणाल्या.

               यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉ.बापूराव पवार म्हणाले की, आज संपूर्ण मानवी जीवन प्रसारमाध्यमांनी व्यापले आहे. मराठी भाषेचे संवर्धन, प्रसार आणि प्रचार करण्यासाठी प्रसारमाध्यमांमध्ये जास्तीत- जास्त मराठीचा वापर केला पाहिजे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, इतर भाषेचा आदर करून त्या-त्या भाषेतील शब्दांचा स्विकार करुन मराठी भाषेतील शब्द वैभव वाढविले पाहिजे. मराठीचे साहित्य वैभव इंग्रजीच्या मदतीने जागतिक स्तरावर पोहोचविले पाहिजे असेही ते शेवटी म्हणाले. प्रारंभी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाविदयालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन मराठी विभागाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. कुमार इंगळे तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. नामदेव पाटील यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक वृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी व सेवक वर्ग उपस्थित होते.

               

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here