कॉपीमुक्त अभियानाचा आढावा..
महाबळेश्वर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा आजपासून (११ फेब्रुवारी) सुरू झाल्या आहेत. महाबळेश्वर तालुक्यात परीक्षा सुरळीत आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या आदेशानुसार, परीक्षा केंद्रांवर भरारी पथके आणि बैठे पथके तैनात करण्यात आली आहेत.
आज परीक्षेच्या पहिल्या दिवशी तहसीलदार तेजस्विनी पाटील, गटविकास अधिकारी यशवंत भांड, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांच्यासह भरारी पथकाने महाबळेश्वरमधील गिरिस्थान प्रशाला आणि पांचगणी येथील कांताबेन मेहता ज्युनिअर कॉलेज या परीक्षा केंद्रांना भेट दिली. पथकाने परीक्षा कामकाजाची पाहणी केली आणि कॉपीमुक्त अभियानाच्या अनुषंगाने तपासणी केली.
भरारी पथकाने परीक्षा केंद्रांवरील व्यवस्था, विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था, तसेच कर्मचाऱ्यांची सतर्कता यांसारख्या गोष्टींची पाहणी केली. तसेच, परीक्षा केंद्रांवर कुठल्याही प्रकारची गैरप्रकार होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती घेतली.पहाणीनंतर भरारी पथकाचे अध्यक्ष तेजस्विनी पाटील यांनी परीक्षा कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच, सर्व परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबविण्यात येत आहे, असे सांगितले.यावेळी तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी सर्व परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त वातावरण राखण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती कोणत्याही गैरप्रकाराशिवाय पार पडणे आवश्यक आहे, असे सांगितले.
गटविकास अधिकारी यशवंत भांड यांनी परीक्षा केंद्रांवर आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. तसेच, विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य व्यवस्था केली आहे, असे सांगितले. गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. या भेटीच्या वेळी नायब तहसीलदार दिपक सोनवणे, सहा. गटविकास अधिकारी महादेव कांबळे, पोलीस उपनिरीक्षक आर.एस. इनामदार, शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव धनावडे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.